Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अर्थसंकल्प पूर्णपणे निराशाजनक लोकांच्या पदरात काही पडणार नाही - पृथ्वीराज पाटील

अर्थसंकल्प पूर्णपणे निराशाजनक लोकांच्या पदरात काही पडणार नाही  - पृथ्वीराज पाटील


सांगली : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या तसेच सध्या अन्य राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. तो पूर्णपणे फसवा आहे, त्यातून शेतकरी, सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय, व्यापारी, छोटे-मध्यम उद्योजक यांच्यासाठी ठोस असे काहीच नाही अशी प्रतिक्रिया सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मध्यमवर्ग व श्रीमंतांना खुश करायचा प्रयत्न केला आहे. 

अतिश्रीमंतावरील कर कमी करून हे सरकार सूट बूट की सरकार आहे, हे पुन्हा एकदात्यांनी सिद्ध केले आहे. टॅक्सबद्दल एकच चमकदार घोषणा करून बाकी सगळ्यांकडे लोकांचे फार लक्ष जाऊ नये, असा हा प्रकार आहे. ते म्हणाले, नव्या घोषणा करताना आधीच्या घोषणांचे काय झाले? शहरांच्या विकासासाठी १० हजार कोटींची घोषणा आहे, मग आधीच्या स्मार्ट सिटीचे काय झाले? नरेगाची तरतूद कमी झाली आहे. शिक्षण व आरोग्य यावरीलही तरतूद कमी झाली आहे. भारतीय लोकांचा इन्स्युरन्सवर विश्वास आहे, त्याचे प्रॉव्हिजन बदलल्याने कन्फ्युजन तयार झाले आहे.

ते म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात नवनव्या नावाने लोकांना बऱ्या वाटाव्यात अशा घोषणा होतात, परंतु प्रत्यक्षात त्यात काहीच नसते, यंदाचा अर्थसंकल्पही तसाच आहे. महागाई वाढत चालली आहे, त्याच्यावर कुठलीही ठोस उपाययोजना त्यांनी सुचवलेली नाही. जीएसटीमध्ये सुलभता आणावी अशी व्यापाऱ्यांची मागणी होती, परंतु त्यात कुठलाच बदल झाला नाही. नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू होण्यासाठी अनुकूल असे वातावरण या अर्थसंकल्पात तरी दिसत नाही, त्यामुळे नवे उद्योग कसे येणार हा प्रश्नच आहे.

ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये दीडपट वाढ होईल, अशी व्यवस्था केली जाईल,अशी घोषणा केली होती, तर कधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशीही घोषणा केली जाते, परंतु प्रत्यक्षात रासायनिक खतांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्यामुळे उत्पादन खर्च वाढला असून घातलेला खर्चही निघत नाही, हे सरकारने लक्षात घेतले नाही. किमान शेतकऱ्यांचे वर्षभर चाललेले आंदोलन लक्षात घेऊन तरी त्यांच्या पदरात काही ठोस असे टाकायला हवे होते. ते म्हणाले, निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कराव्यात तशा या अर्थसंकल्पातल्या घोषणा आहेत, त्यातून देशाच्या विकासाचे काही होईल, असे चित्र दिसत नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.