Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पैठणीसाठी दीन होणा-या आया-बायांना महिला दिनाचं काय सांगणार ?

पैठणीसाठी दीन होणा-या आया-बायांना महिला दिनाचं काय सांगणार ?


अलिकडे पैठणींच्या कार्यक्रमाचे प्रचंड पेव फुटले आहे. गावोगाव, खेडो-पाड्यात पैठणीच्या कार्यक्रमांचा धुमाकूळ चालू आहे. या कार्यक्रमाला महिलामंडळही तोबा गर्दी करताना दिसते आहे. प्रचंड गर्दीत, उत्साहात सदरचे कार्यक्रम संपन्न होत आहेत. राजकीय मंडळी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी व  महत्वकांक्षेसाठी पैठणी नावाच्या शंभर दिडशे रूपयेच्या बोगस साड्या आणतात, महिलांची गर्दी गोळा करतात. साड्या वाटतात आणि निवडणूकीचे राजकारण सोपे करतात. त्यांचा हा पैठणीचा फंडा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतो आहे. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमापण या गर्दीत सामिल होत आहेत. पैठणीसाठी  रांगेत उभं रहात आहेत. स्टेजवर जाऊन नाचत आहेत. कुठला तर भावोजी येतो, या आया-बायांना नाचवतो. त्या ही नाचतात. विजेत्या रणरागिणी घोषित केल्या जातात. सरतेशेवटी पैठण्या वाटल्या जातात.  आपण फार मोठा पराक्रम केल्याच्या, मोठे युध्द जिंकून आल्याच्या थाटात पैठणी घेवून या आया-बाया घरी येतात. हे चित्र गावोगाव आहे. पैठणीसाठी दीन होणा-या या आया-बायांना महिला दिनाचं काय सांगावं ? 

गावोगाव, शहरो-शहरात जथ्थेच्या जथ्थे पैठणीसाठी गोळा होताना दिसत आहेत. महिला वर्गाला गोळा करण्याचा हा फंडा चांगलाच यशस्वी ठरलाय. ब-यापैकी सर्व थरातील महिला गर्दी करताना दिसत आहेत. हा एकूण प्रकार पाहून अस्वस्थ झाल्याशिवाय रहात नाही. एका पैठणीसाठी तीन तीन तास जाऊन बसणा-या, रांगेत उभं राहणा-या,  तिथला भावोजी नाच म्हणेल तस नाचणा-या या आया-बायांना पाहिल्यावर अस्वस्थ होतं. या महिलांच्या डोक्यात आत्मसन्मानाचा विचार का येत नाही ? एका पैठणीसाठी जावं, रागेत उभं रहावं, कुणाच्याही तालावर नाचावं इतपत या महिला निसुक झाल्या काय ? त्यांना स्वत:च्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची याद का येत नाही ? फुकटात मिळणा-या एका साडीसाठी इतकी झुंबड महिलांनी का करावी ? याचे आश्चर्य वाटते. जिथे गरिबी टोकाची आहे अशा आदिवासी पाड्यातल्या महिलाही एका साडीसाठी अशा उथळ व  लाचार झालेल्या पाहिल्या नाहीत. त्यांची परस्थिती अत्यंत गरिबीची आहे, बिकट आहे तरीही त्या त्यांच्या आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची तडजोड करत नाहीत. कुठं निघालोय आपण ? "अडाणी आई आणि घर वाया जाई !" असं सांगितल जात होतं. आता या शिकलेल्या मम्म्यांनी असं वागावं, असं वाया जावं ? याचे आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. 

फुकटात साड्या वाटणारे लोक धर्मकार्य किंवा समाजकार्य म्हणून साड्या वाटत नाहीत. त्यांच्या नमकहरामीचे व पापाचे पैसे ते राजकीय गुंतवणूक म्हणून अशा पध्दतीने खर्च करतात. मतांसाठी फुकटात साड्या वाटतात. या लोकांच्या नमकहरामीचे, पापाच्या पैशाचे वस्त्र या महिला अंगावर कशा काय नेसतात ? ते नेसून अभिमानाने कशा काय मिरवतात ? जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. या शिकलेल्या महिलांनी इतकं वेडं व्हाव ?याचे आश्चर्य वाटते. महिलांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे जरूर जगावे तो त्यांचा हक्क आहे. त्यांनी साडी नेसावी, चुडीदार घालावा का आणि काय घालावे ? हा ही त्यांचा हक्क आहे. त्यांनी गाणे म्हणावे, नाचावे, त्यांची कला जोपासावी हा ही त्यांचा हक्क आहे. त्या बद्दल आमचा आक्षेपच नाही. त्यांनी काय करावं ? साडी नेसावी की नाही, नाचावं की नाही ? या बाबत आम्हाला काहीच म्हणायचे नाही. तो त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. 

पण एका एका साडीसाठी लाचारीचे जे टुकार प्रदर्शन सुरू आहे त्यावर आमचा आक्षेप आहे. एका पैठणीसाठी घरची कामं-उद्योग सोडून ताटकळत रांगा लावणा-या या महिला पाहिल्यावर चिंता वाटते. कसं व्हायच या समाजाचं ? हा प्रश्न अस्वस्थ करतो. ज्या महिलांना स्वत:चे मुल्य नाही, स्वाभिमान, आत्मसन्मान नाही त्या महिलांच्या घरातली कार्टी दारूच्या बाटलीवर कुणाचाही प्रचार करायला बाहेर पडणार ? ढाब्याचे कुपन दिले, मटनाची पिशवी दिली की कुणाचाही जिंदाबाद करायला बाहेर पडणार. ज्या आईला, बहिणीलाच जर  स्वाभिमानाची जाण नसेल तर त्यांच्या पिढीकडून काय अपेक्षा ठेवणार ? लाचार आया-मायांच्या घरात शिवाजी महाराज, संभाजीराजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर कसे निर्माण होणार ? एका फुकटातल्या साडीसाठी तासंतास रांगेत उभं राहणा-या महिलांच्या घरातले पुरूष इतके दळभद्री व कर्मदरिद्री आहेत का की ते एक साडीही घेवू शकत नाहीत ? मनाचे हे दीनपण या आया-मायांना का खटकत नाही. त्या का अशा हिनदीन व लाचार होताना दिसत आहेत ? 

बायका शिकाव्यात म्हणून दगड-गोटे झेलणा-या सावित्रीमायचा जीवघेणा संघर्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेल्यावर रमाई मातेनं कसेकसे दिवस काढले ? कसा कसा संघर्ष केला ते  एकदा या मम्म्यांनी मुळापासून वाचावे. नवरा मुख्यमंत्री असताना किराणा दुकानाची उधारीही निट न भागवता न येणा-या यशवंतराव चव्हाणांच्या पत्नीचा संघर्षही वाचावा. किती प्रतिकुल परस्थितित त्यांनी दिवस काढले याचा विचार करावा. रमाई आंबेडकरांचा संघर्ष तर डोळ्यात पाणी आणणारा आहे. या शिकलेल्या आया-मायांनी गांभिर्याने विचार करावा. मोघलाईच्या काळात फुकटातल्या पैठणीसाठी जिजाऊ रांगेत उभी राहिली असती तर स्वराज्य उभ राहिलं असतं का ? शिवबा घडला असता का ? शिवबाचा छत्रपती शिवाजी राजा घडला असता का ? हा ही विचार करावा. आया-मायांनी या लाचारीला झुगारून द्यावे. 

आपल्या अंगावर फाटकं कापड असले तरी चालेल पण ते आपल्या कष्टाचं, आपल्या मेहनतीचेच असले पाहिजे. कुणाच्या पापाच्या पैशाची, नमकहरामीची पैठणी आपल्या अंगावर का व कशासाठी ? हा प्रश्न का पडत नाही या महिलांना ? बर फुकटात साड्या वाटणारे राजा हरिश्चंद्र नाहीत. हे लोक फुकटात देतात ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. तुम्हाला लाचार करायला, गुलाम करायला ते हे फंडे वापतात. एका पैठणीत तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गहाण टाकता, एका पैठणीसाठी तुम्ही तुमचा विकासाचा कार्यक्रम गहाण टाकता,  तुमचा सत्याचा आवाज गहाण टाकता.  दिड-दोनशे रूपयेच्या टुकार पैठणीसाठी खुप काही मौल्यवान गोष्टी गमावता. खुप किमती गोष्टींचा सौदा खुप स्वस्तात करता आहात. आया-मायांनो तुमचा आत्मसन्मान व  स्वाभिमान जीवंत असेल तर जरूर विचार करावा ही विनंती.


दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी..


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.