महावितरणला स्वस्तात मिळणार वीज..
वाढत्या वीज दरामुळे मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने स्वस्त दराच्या वीज खरेदीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार सौर ऊर्जा प्रकल्पातून तब्बल 560 मेगावॅट वीज केवळ 2.88 रुपये प्रतियुनिट दराने खरेदी करण्यासाठी महावितरण आणि अवाडा एनर्जीसोबत करार झाला आहे. पुढील 25 वर्षे महावितरणला स्वस्त दराने वीज मिळणार असल्याने वीज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
महावितरणचे राज्यात पावणेतीन कोटी वीज ग्राहक असून त्यांना दररोज सुमारे 22-23 हजार मेगावॅट वीज पुरवली जाते. यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक वीज कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातील आहे. सदरच्या विजेचा दर जास्त असल्याने सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या डोक्यावर वीज दरवाढीच्या माध्यमातून मोठा भार पडतो. त्याची दखल घेत महावितरणने औष्णिक प्रकल्पातील विजेऐवजी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून स्वस्त दराची वीज खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार अवाडा एनर्जीला राज्यात 560 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे टेंडर दिले असून त्यामध्ये वर्षाला तयार होणारी सुमारे 951 दशलक्ष युनिट वीज खरेदी करण्यासाठी करार केला आहे. सदर सैर ऊर्जा प्रकल्प अवाडा एनर्जीने पुढील 18 महिन्यांत उभारून प्रत्यक्ष वीजनिर्मिती करणे बंधनकारक आहे.
सर्वात कमी वीजदर
महावितरण सध्या औष्णिक वीज प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, गॅस वीज प्रकल्प, सौर आणि पवन वीज प्रकल्पातील वीज खरेदी करते. सध्याच्या वीज प्रकल्पाचा विचार करता अवाडा एनर्जीकडून मिळणारी वीज सर्वात स्वस्त ठरली आहे. औष्णिक वीज प्रकल्पातील प्रतियुनिट विजेचा दर साडेतीन-चार रुपये आहे, तर गॅसवरील वीज प्रकल्पातील विजेचा दर पाच रुपयांच्या घरात असून जुन्या सौर प्रकल्पातील विजेलाही मोठी किंमत मोजावी लागत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
