Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुधाच्या भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या पावडरचा साठा जप्त

दुधाच्या भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या पावडरचा साठा जप्त 


अंकुश कुंडले यांच्या राहत्या घराची तपासणी करून दुधामध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे रिफाईन्ड पामोलिन ऑईल व व्हे पावडरचा साठा जप्त करून ताब्यात घेत मिक्स साठा नष्ट करण्यात आला आहे.

मिरज: सांगली जिल्ह्यात  अन्न व औषध प्रशासन विभागाने मिरज तालुक्यातील जानराववाडीमध्ये छापेमारी  केली आहे. सुहास अंकुश कुंडले यांच्या राहत्या घराची तपासणी करून दुधामध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे रिफाईन्ड पामोलिन ऑईल व व्हे पावडरचा साठा जप्त करून ताब्यात घेत मिक्स दुधाचा  साठा नष्ट केला. अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी ही माहिती दिली.

या कारवाईत 5 हजार 877 रूपये किंमतीचे 38 किलो रिफाईन्ड पामोलिन ऑईल, 23 हजार 944 रूपये किंमतीची 146 किलो व्हे पावडर व 320 रूपये किंमतीचा 8 लिटर मिक्स दुधाचा साठा आढळला. दुध व्यवसायिकाकडून सर्व अन्न पदार्थ व भेसळकारी पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरीत साठा जप्त करण्यात आला. सदर ठिकाणी बाजूच्या प्रद्युम्न खोत यांच्या घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधित तंबाखू 200 ग्रॅमचे 507 बॉक्स (किंमत 41 हजार 320 रूपये) साठा आढळल्याने सदरचा साठा जप्त करून ताब्यात घेण्यात आला. खोतविरोधात मिरज ग्रामिण पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) मसारे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे, श्रीमती हिरेमठ, स्वामी व नमुना सहायक कवळे यांच्या पथकाने केली. नागरिकांना अन्न भेसळीबाबत माहिती असल्यास त्यांनी अन्न औषध प्रशासन सांगली कार्यालयाशी 0233-2602202 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा राज्यस्तरीय टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन मसारे यांनी केले आहे.

दुसरीकडे, मार्च महिन्यात सांगलीमध्येच बेदाण्याला चकाकी येण्यासाठी चक्क डिटर्जंट पावडरचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत 7 लाख 63 हजाराचा बेदाणा जप्त केला होता. कुपवाड एमआयडीसीमधील मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन, मे. बाबा ड्राय फ्रुटस आणि मे. चौगुले ट्रेडिंग या तीन बेदाणा वॉशिंग आणि रिपॅकिंग सेंटरची तपासणी करत असताना हा प्रकार समोर आला होता. जिल्ह्यामध्ये सध्या बेदाणा उत्पादनाचा कालावधी असल्याने बरीच नवीन बेदाणा वॉशिंग, रिपॅकिंग सेंटर कार्यरत झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे आणि स्वामी यांच्या पथकाने कुपवाड एमआयडीसी येथील काही पेंढ्यावर छापे टाकले. या तपासणी दरम्यान या पेढ्यांना परवाना नसल्याचे आणि वॉशिंग सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.