Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुन्हा सेवेवर परतत असताना जवानाचा अपघातात मृत्यू

पुन्हा सेवेवर परतत असताना जवानाचा अपघातात मृत्यू


सातारा:  नागेवाडी (भाडळे) येथील अंकुश संपतराव माकर या जवानाचे अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांचे निधन झाल्याने अंकुश हे आठ दिवसांची सुट्टी घेऊन घरी आले होते. मात्र सुट्टी संपल्यानंतर ते सेवेवर रुजू होण्यासाठी निघाले होते. मात्र बुधवारी राजस्थानमध्ये रेल्वे अपघातात त्यांचे निधन झाले. जम्मूतील कालचुक या सैन्य दलाच्या मुख्यालयात आपल्या सेवेवर हजर होण्यासाठी ते निघाले असताना ही घटना घडली.

नागेवाडी येथील वीर जवान नाईक अंकुश संपतराव माकर कालूचक जम्मू-काश्मीर येथे बॉम्बे इंजिनिअर युनिट नंबर १०६ मध्ये कार्यरत होते. अंकुश माकर हे १९ वर्षांपासून दलात सेवा बजावत होते. त्यांनी लेह-लडाख, पंजाब, जम्मू काश्मीर, महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्कृष्ट देशसेवा केली. तसेच त्यांच्या सेवानिवृत्तीला केवळ चार महिने बाकी होते. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.

अंकुश माकर यांच्या निधनाची माहिती रविवारी नागेवाडीसह विविध गावांमध्ये पोहचल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, मागील आठवड्यात वडिलांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांतच लेकाचे ही निधन झाल्याने अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत.

आज नागेवाडी येथे अंकुश माकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. माकर यांच्या पश्चात वृद्धा आई, पत्नी माधुरी माकर, मुलगा ओंकार (वय १२), मुलगी रोशनी (वय ६), दोन भाऊ असा परिवार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.