लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक 10,000 रुपये द्या; अनिल बोकील
सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जाती-धर्माचे राजकारण होईल, जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी वातावरण गढूळ बनवण्याचे कारस्थान केले जाईल, त्याला बळी न पडता वेळीच कांगावा ओळखून ज्येष्ठ नागरिकांनी सजग राहावे, असे आवाहन 'अर्थक्रांती'चे जनक अनिल बोकील यांनी केले.
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 10 हजार रुपये मानधन देणे शासनाला सहज शक्य आहे. ते मिळवण्यासह मागण्यांसाठी लोकसभा निवडणुकीत एल्गार पुकारू, असा इशाराही अनिल बोकीलयांनी दिला. डॉ. आंबेडकर क्रीडांगणावर अर्थक्रांती, सांगली जिल्हा ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव सोहळ्याप्रसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.ते म्हणाले, ''60 वर्षांवरील प्रत्येक नागरिक ही या देशाची संपत्ती आहे. आयुष्यभर कष्ट करून चरितार्थ चालवताना त्यांनी शासनाला कर भरून देशाच्या विकासाला हातभार लावलेला असतो. त्यांचा उतारवयात सन्मान करणे शासनाचे कर्तव्य व जबाबदारीही आहे. केवळ भावनिक मुद्द्यांवर राजकारण करून सत्ता मिळवण्याचा सगळेच पक्ष, संघटना प्रयत्न करतात.''येत्या निवडणुकीत दरमहा १० हजार रुपये मानधन द्यावे, १५ कोटी ज्येष्ठांसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, किमान प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आयोगाची नेमणूक करावी, यांसह अन्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असंही बोकील म्हणाले.माजी खासदार बसवराज पाटील म्हणाले, "ज्येष्ठांसाठी ॲस्ट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर विशेष कायदेशीर आचारसंहिता निर्माण करावी. आरोग्य, व्यक्तिगत संरक्षण सेवांमध्ये विशेष दर्जा मिळावा. या मागण्या मान्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ."
अर्थक्रांती'चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. उल्लेखनीय कार्याबद्दल गोविंद परांजपे (माधवनगर), सुधीर नाईक (मिरज), उद्योजक सर्जेराव यादव (इस्लामपूर), उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रौनक शहा (सांगली), यशस्विता संस्थेच्या सुनीता बने यांचा गौरव करण्यात आला. व्ही. एन. देशमुख यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.