येरवडा कारागृहात कैद्याकडे सापडला मोबाईल संच
पुणे : येरवडा कारागृहात एका कैद्याकडे मध्यरात्री मोबाईल संच सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. कारागृहात मोबाईल संच जॅमर यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र कैद्याकडे मोबाईल संच सापडल्याने मोबाईल जॅमर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यापूर्वीही कारागृहात मोबाईल संच सापडला होता. मात्र, त्याचा तपास अद्याप लागलेला नाही.
येरवडा कारागृहातील बराक क्रमांक एकमध्ये तपासणी सुरू असताना सुरक्षारक्षकांना मोबाईल संच सापडला. त्यामध्ये सीमकार्ड आणि बॅटरीही होती. मोबाईलवरून बाहेर संपर्क साधण्यात आल्याचा संशय आहे. कारागृह रक्षकांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये अश्विन आनंदराव चव्हाण (रा. पिंपरी ) याने मोबाईल संच बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. चव्हाण एका खून प्रकरणात आरोपी आहे. या संदर्भात कारागृह अधिकारी अमोल जाधव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरवमधील काटेपूरम चौकात १८ डिसेंबर २०२२ ला भरदिवसा गोळीबार करून योगेश जगताप यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात अश्विन चव्हाण मुख्य आरोपी आहे. फरारी असतानाच्या काळात त्याने हातात पिस्तूल घेऊन समाजमाध्यमात छायाचित्र प्रदर्शित केले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास करून चव्हाणला पकडले होते. त्या वेळी त्याने पोलिसांवर हल्ला केला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश या कारवाईत सहभागी झाली होते. त्या वेळी कृष्ण प्रकाश यांनी त्याला झाडाची फांदी फेकून मारली होती. कृष्ण प्रकाश कारवाईत स्वत: सहभागी झाले होते. त्यांनी आरोपीला पकडल्याने पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांची कारवाई चर्चेचा विषय ठरली होती.
दरम्यान, येरवडा कारागृहात गेल्या महिन्यात रुग्णालयीन कक्षामध्ये एक मोबाईल संच आढळला होता. मात्र, मोबाईल संच नेमका कोणाचा होता, याचा तपास अद्याप लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास येरवडा पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.