सांगलीत नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोघांना अटक
सांगली : नायट्रोव्हेट, नायट्रोसन या नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गोळ्या, रोकड असा 3 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरातील कर्नाळ रस्त्यावरील शिवमुद्रा चौक येथे एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
अनिकेत विजय कुकडे (वय 21, रा. बुरुड गल्ली, सांगली), उमर सलीम महात (वय 20, रा. गवळी गल्ली, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात अंमली पदार्थ, नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री होत असल्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे असे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी एक पथक तयार केले होते.या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत कुकडे नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी कर्नाळ रस्त्यावरील शिवमुद्रा चौक येथे येणार असल्याची माहिती खबऱयाद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. त्यावेळी कुकडे याच्याकडून या गोळ्या खरेदी करण्यासाठी उमर महात तेथे आला. या गोळ्यांची जादा दराने विक्री करताना कुकडे याला तर त्या खरेदी करताना महात यांना पकडण्यात आले. दोघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, मच्छिन्द्र बर्डे, संदीप पाटील, गौतम कांबळे, विक्रम खोत, संतोष गळवे, बिरोबा नरळे, सागर लवटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.