सासू-सासऱ्यांसोबत राहण्यास नकार देणाऱ्या सुनेला पोटगी नाही
सासू सासऱ्यांसोबत राहण्यास नको म्हणणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोटगीसाठी नकार दिला आहे. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. कुटुंब न्यायालयानंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पत्नीस चपराक बसली आहे.
या प्रकरणातील दाम्पत्याचे 18 एप्रिल 2018 रोजी लग्न झाले असून ते नागपूरचे रहिवासी आहेत. लग्नानंतर पती व सासू-सासऱयाने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. पत्नी महानुभाव पंथाची अनुयायी आहे. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. त्यामुळे पती व सासू-सासरे तिचा शारीरिक-मानसिक छळ करत असल्याचा आरोप करत पत्नी माहेरी निघून गेली. परंतु हे आरोप सिद्ध झाले नाहीत.
कुटुंब न्यायालयात पत्नीने दिलेल्या जबाबानुसार, तिची पतीविरुद्ध काहीच तक्रार नसल्याचे दिसून आले. तसेच सासू-सासऱयांसोबत नको तर केवळ पतीसोबत रहायचे असल्याचे आढळून आले. 2010 मध्ये पत्नी माहेरी गेली होती. त्यावेळी ती पतीसोबत परत आली होती. छळ झाला असता तर, तिने सासरी परत येण्याचा निर्णय घेतला नसता, याकडे हा निर्णय देताना लक्ष वेधण्यात आले. पत्नी आठवडय़ातून तीन दिवस महानुभाव पंथीय मंदिरात जात होती. त्यावरून तिला मंदिरात जाण्याची मुभा होती, हे स्पष्ट झाले.
पत्नी कोणत्याही ठोस कारणांशिवाय पतीपासून वेगळी झाली असून तिला सासरी परत आणण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. पतीने स्वतःहून पत्नीची देखभाल करणे टाळले नाही. त्यामुळे तिला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. कुटुंब न्यायालयाने 9 मे 2014 रोजी पत्नीची मासिक पाच हजार रुपये पोटगीची मागणी नामंजूर केली होती. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.