कोचिंग सेंटरला आग, जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तिसऱ्या मजल्यावरून उडय़ा
दिल्लीतील मुखर्जी नगर परिसरातील संस्कृती कोचिंग सेंटरच्या इमारतीला गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या वेळी इमारतीत 400 हून अधिक विद्यार्थी होते. जीव वाचविण्यासाठी घाबरलेले विद्यार्थी दोरीच्या सहाय्याने खाली उतरताना दिसले, तर काहींनी खिडकीतून उडय़ा मारल्या. सुदैवाने या आगीमुळे कोणत्याही विद्यार्थाला दुखापत झाली नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु इमारतीच्या खिडकीतून उडी मारल्यामुळे चार विद्यार्थी जखमी झाले आहेत.
दरम्यान, अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दिल्लीच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग म्हणाले, आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.27 वाजता ही आग लागली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. दिल्लीतील मुखर्जी नगर म्हणजे कोचिंग सेंटर हब आहे. येथे सिव्हिल सर्व्हिसेस, स्पर्धा परीक्षांपासून ते इतर कोचिंग क्लासेस मोठय़ा प्रमाणात आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येथे खासगी कोचिंगसाठी येत असतात. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या आगीमुळे कोचिंग सेंटरच्या इमारतीत सर्वत्र धूर झाला होता. यामुळे अनेक विद्यार्थी दोरीच्या सहाय्याने खिडकीतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी इमारतीच्या आत अनेकजण अडकल्याचे सांगितले. या घटनेनंतर कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले. आग लागलेल्या इमारतीच्या आत अनेकजण अडकले असून पोलीस मृतांचा आकडा लपवत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.