अजित पवार यांचा खळबळजनक आरोप
ठाणे जिल्ह्यात केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 100 बगलबच्च्यांना अनावश्यक पोलीस संरक्षण देण्यात आले असून त्या खर्चाचा भार सरकारी तिजोरीवर पडत आहे, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण दिले पाहिजे यात दुमत नाही.
सर्वसामान्य लोकांचा जीव धोक्यात आला तर त्यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे. पण ठाणे जिह्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. संरक्षण दिलेल्या या व्यक्ती कोण आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूनही ती माहिती जाणीवपूर्वक दिली जात नसल्याचेही ते म्हणाले. बरोबरच असं काय घडलंय की या 100 लोकांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली, असा सवालही त्यांनी केला. ज्यांना संरक्षण दिलेय त्यांची यादी आणि हुद्दा जाहीर करा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
फक्त मोठेपणा मिरवण्यासाठी
ज्या 100 लोकांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्यात आले आहे त्यांना धोका असण्याचे कारण नसल्याचे सांगत अजित पवार यांनी या 100 लोकांची यादी आपल्याकडे असल्याचे सांगितले. या यादीमधील अर्ध्याअधिक लोकांना फक्त मोठेपणा मिरवण्यासाठी संरक्षण पुरवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेच्या पैशाच्या जोरावर, सरकारी पैशाच्या जोरावर मोठेपणा करण्याचा प्रयत्न कशाला करता, असा सवालही त्यांनी केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करा
ठाणे जिह्यातील मानपाडा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी प्रचंड बेहिशेबी मालमत्ता जमा केली असून त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.