भररस्त्यात मुलांसमोरच बापाने घेतला आईचा जीव
जळगाव : जळगाव जिल्ह्यात एरंडोल शहरातील गांधीपुरा भागातील वखार गल्ली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. जोडप्यामध्ये एकमेकांसोबत राहण्यावरुन वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड आणि फरशी मारली. मारहाणीमध्ये पत्नी गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. मयत विवाहितेची नाव हर्षदा किरण मराठे (वय 27 वर्ष) आहे. याप्रकरणात पोलिसांनी संशयित पती किरण महादू मराठे (वय 35 वर्ष) याला ताब्यात घेतले आहे.
पती किरण हा एरंडोल शहरामध्ये बालाजी ऑईल मिल येथे मजूर म्हणून काम करतो. त्यावर तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असतो. एरंडोल शहरामध्ये गांधीपुरा भागात किरण हा आपली आई, वडील, पत्नी व दोन मुले या कुटुंबासह वास्तव्यास आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून किरण आणि पत्नी हर्षदा यांच्यामध्ये वेगवेगळ्या कौटुंबिक कारणांवरून वाद होत असे. हर्षदा हि सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळली होती. त्यामुळे हर्षदाला किरणकडून घटस्फोट हवा होता, ती पती किरण सोबत एकत्र राहण्यास तयार नव्हती, मात्र किरणचा घटस्फोट देण्यास नकार होता. पती किरण हर्षदाने सोबतच रहावे यासाठी वाद घालत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोघांमध्ये गल्लीतच झाले होते कडाक्याचे भांडण
एकमेकांसोबत घटस्फोट देण्याच्या कारणावरुन सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हर्षदाचा पती किरण यांच्यामध्ये वाद झाला. वाद करतच दोघे घराबाहेर पडले आणि जोरजोरात एकमेकांबरोबर भांडू लागले. या वादातून रागाच्या भरात किरणने हर्षदाच्या डोक्यात कुऱ्हाड आणि फरशी मारली. यात हर्षदा गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्त्राव झाल्याने हर्षदचा जागीच मृत्यू झाला.
तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मार्फत घटनेची माहिती एरंडोल पोलिसांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीष गोराडे आणि सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. हर्षदचा मुतदेह हा एरंडोल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मयत हर्षदा हिचे माहेरचे नातेवाईक पवन राजेंद्र मराठे यांच्या फिर्यादीवरुन पाोलिसांनी संशयित आरोपी पती किरण मराठे याला ताब्यात घेतले आहे. फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाअसून पुढील तपास पोलीस निरिक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.
मुलांच्या समोरच वडिलांनी घेतला आईचा जीव
मयत हर्षदाचे माहेर नंदुरबार जिल्ह्यातील आहे. हर्षदा आणि किरण या दोघांना 8 वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा अशी दोन अपत्य आहेत. सदर घटना घडली त्यावेळी दोन्ही मुले याचठिकाणी होते. आपल्या डोळ्यादेखत वडीलांनी आईचा जीव घेतल्यामुळे दोन्ही मुले सुन्न झाली आहेत. या घटनेने दोन्ही मुले आईच्या मायेला पोरकी झाली आहेत. तर दुसरीकडे वडील सुद्धा जेलमध्ये गेल्याने वडिलांच्या प्रेमालाही मुले मुकणार आहेत. या घटनेने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.