Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत कृष्णामाईचे पात्र कोरडे ठणठणीत; कोयना धरणात फक्त दोन महिने पुरेल इतकाच साठा उपलब्ध

सांगलीत कृष्णामाईचे पात्र कोरडे ठणठणीत; कोयना धरणात फक्त दोन महिने पुरेल इतकाच साठा उपलब्ध 


कोयना धरणामध्ये सध्या केवळ 12 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे कोयना धरणातील विसर्ग कमी केल्याने कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पुन्हा नदीचे पात्र कोरडे पडत असल्याचे चित्र सांगली शहरालगतच्या पात्रात दिसून येत आहे. नदीत पाणी कमी सोडल्याने नदीमधील पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा कमी होत आहे. या सगळ्या बाबीच्या अनुषंगाने पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. कृष्णा नदीतील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने सांगली, मिरज, कुपवाड शहराच्या पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम झाला आहे. शहरात पाणी टंचाई जाणवत असून महापालिकेकडून देखील पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

पाऊस लांबल्याने पाणीसंकट

मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यामध्येही पाणीटंचाई भासू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, पूर्वमोसमी पावसासह वळीव पावसाने सुद्धा दडी मारल्याने स्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनाचे कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पिण्याचे पाणी त्याचबरोबर शेतीसाठी पाणी याचा ताळमेळ बसवताना परिस्थिती बिकट होत आहे.

तर कोयना धरणात दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा

सध्या धरणातून पिण्यासाठी एक टीएमसी पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास कोयना धरणामध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोयनेतील पाण्याचे जपूनच नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या 1 हजार 50 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्याचा थेट परिणाम सांगली-मिरज शहरावर होत आहे. त्यामुळे सांगली महापालिकेकडूनही पाण्याचे नियोजन सुरु आहे. संपूर्ण जून महिन्यात पाणी अत्यंत जपून वापरण्याचे पाटबंधारे विभागाचे धोरण आहे. पाऊस लांबला तर अडचण होऊ शकते, या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. दुसरीकडे, चांदोली धरणात 12 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

धरणे भरुनही बिकट परस्थिती

गेल्यावर्षी सर्व धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षभरात टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि आरफळ योजनांसाठी सलगपणे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. पाणीटंचाईची संभाव्य स्थिती विचारात घेऊन आखणी सुरु असताना पाटबंधारे विभागाने पूर, महापुराच्या दृष्टीनेही तयारी ठेवली आहे. महापूर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.