Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर आठ रुपयांनी घसरले

दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर आठ रुपयांनी घसरले


शेतीला जोडधंदा म्हणुन दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते. दुधाला प्रतिलिटर 38 रुपये भाव मिळत होता, परंतु गेल्या दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर टप्याटप्याने कमी होत 8 रूपयांनी कमी झाले आहेत. उन्हाळ्यात दूध उत्पादन कमी होते आणि मागणी वाढते, त्यामुळे उन्हाळ्यात दुधाचे खरेदी दर वाढतात. या वर्षी मात्र दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत.

बीड तालुक्यातल्या आहेर चिंचोली गावच्या दादासाहेब बहिर यांच्याकडे 9 गाई आहेत, दररोज 120 लिटर दुधाची ते विक्री करतात. पूर्वी याच दुधाला 38 ते 42 रुपयांचा भाव मिळायचा, मात्र आता 32 रुपये लिटर प्रमाणे भाव मिळत असल्याने त्यांचा दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. एकीकडे दुधाचे भाव कमी झाले असून गाईंच्या चाऱ्याचा खर्च वाढल्याने पशुधन कसं सांभाळायचं? असा प्रश्न दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे.

दुधाला चांगला भाव मिळत असल्याने बीडचे शेतकरी दीपक सावंत यांनी देखील 11 गाई घेतल्या आणि आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला. महिन्याला 1 लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न ते या दुग्ध व्यवसायातून घ्यायचे. मात्र गेल्या एक महिन्यापासून दुधाचे भाव 6 ते 8 रुपयांनी कमी झाल्याने दुधातून मिळणारा पैसा कमी झाला आहे. तर दुसरीकडे, जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचे भाव वाढल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याचं ते सांगतात.

या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही दुधाचं उत्पादन 10 टक्क्यांनी घटलं आहे. अलीकडच्या काळात पशुखाद्याचे दर प्रति 50 किलोला 200 रुपयांनी वाढले आहेत, तर गोळीपेंडीतही 50 किलोला 250 रुपयांपर्यत वाढ झालेली आहे. अन्य पशुखाद्याच्या दरातही वाढ झाली आहे. उन्हाळ्यात दरवर्षी दूध आणि दुग्धजन्य पदार्थाला मागणी अधिक असते. यंदा पहिल्यांदाच उत्पादन कमी आणि दरही कमी झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुहेरी कोंडीत सापडले आहेत.

दुग्धजन्य पदार्थांची आयात होणार असल्याची चर्चा आणि देशाअंतर्गत दूध पावडर आणि बटरचे दर कमी झाल्याने दुधाचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे. उन्हामुळे दूध उत्पादन घटत असताना दुधाचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत आहे. उत्पादनावर होणारा खर्च देखील वाढला असल्यामुळे नव्याने दूध व्यवसाय सुरू केलेल्या अनेक तरुण शेतकऱ्यांसमोर दुधाचे भाव कमी झाल्याने एक नवं संकट उभं राहिलं आहे. उन्हाळ्यामध्ये दूध उत्पादन कमी होणं, हे स्वाभाविक समजलं जातं. यावर्षी मान्सून लांबला असल्याने या काळात पशुधन सांभाळायचं कसं? आणि त्यांना चारायचं काय? असा भीषण प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.