10 ऑगस्टपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता - पृथ्वीराज चव्हाण
अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. येत्या 10 ऑगस्टपर्यंत अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आमच्या राजकीय आकलनुसार 10 ऑगस्टच्या आत किंवा एक-दोन दिवसांमध्ये अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण एकनाथ शिंदे भाजपचे नेतृत्व योग्य पद्धतीने करू शकणार नाही. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप जाण्यास इच्छुक दिसत नाही.
त्यामुळे एकनाथ शिंदेंना दुसरी सन्मान जनक जबाबदारी द्यावी आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पद द्यावं असा त्यांचा निर्णय झालेला दिसतोय. हा माझा अंदाज आहे. हा एक मोठा जुगार आहे. भाजपला हा जुगार खेळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पुढे बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. ती त्यांची फेअरवेल पार्टी तर नव्हती ना? कारण जेव्हा नवीन पद मिळतं तेव्हाच अशा भेटीगाठी होतात. या भेटीमागे काहीच असे ठोस कारण नव्हते.”
दरम्यान, 02 जुलै रोजी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासूनच ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर या चर्चांनी वेग धरला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.