लाख मोलाचाआनंदाचा क्षण !
साधारणपणे २००२ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी भारती विद्यापीठाच्या सांगलीतील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा संचालक म्हणून काम पाहात होतो. या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचं वैशिष्ट्य म्हणजे येथील जवळपास सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मुलं असायची. मराठीमधून शिक्षण झालेली. शहरामध्ये पहिल्यांदाच आलेली. सर्वांची परिस्थिती बेताचीच किंबहुना हालाखीचीच. यातील बहुतेक सर्वच मुलांना आर्थिक मदत करणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं हे महत्वाचं काम मी त्यावेळी करत होतो आणि आजही करत आहे.
अशाच केलेल्या मदतीमधून आज दोनशेहून अधिक विद्यार्थी जगभरात आपलं आणि भारती विद्यापीठाचं नाव उंचावत आहेत. २००२ साली असाच एक मुलगा माझ्याकडं एम.बी.ए.च्या प्रवेशासाठी आला. त्याचं गाव होतं आटपाडी तालुक्यातलं गोमेवाडी. हा सर्व भाग कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. हा गरीब घरातील शेतकऱ्याचा मुलगा माझ्या केबिनमध्ये आला. पायात स्लीपर होतं. त्याला फी भरण्याची अडचण होती पण त्याच्याकडं पाहिल्यानंतर लक्षात आलं की, त्याच्यात शिकण्याची जिद्द जबरदस्त होती. शैक्षणिक कर्जासाठी तो परस्पर एका राष्ट्रीयीकृत बँकेत गेला होता. बँकेनं तारण किंवा जामीन नसल्यानं शैक्षणिक कर्ज देण्यास नकार दिला होता. त्यामुळं अत्यंत खिन्न मनानं तो माझ्यासमोर उभा होता. मी त्याला विचारलं, "कोणत्या बँकेनं तुला कर्ज नाकारलं आहे"? त्यानं मला बँकेचं नाव सांगितलं. योगायोगानं मला त्या बँकेच्या मॅनेजरची ओळख होती. मी त्यांना लगेच फोन केला आणि या मुलास कर्ज देण्याबद्दल विनंती केली. मॅनेजर म्हणाले, जर पगारदार व्यक्ती जामीनदार म्हणून मिळाल्यास कर्ज देता येईल. मी मागचा पुढचा विचार न करता बँक मॅनेजरला सांगितलं की, मी स्वतः जामीनदार होतो, तुम्ही कर्ज द्या. त्याप्रमाणं मी जामीनदारकीच्या सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या. हे जे काही चाललं होतं, त्यावर या मुलाचा विश्वासच बसत नव्हता.
पहिल्या वर्षीचं त्याचं शिक्षण पूर्ण झालं. दुसऱ्या वर्षी मी त्याला आमचं दैवत पतंगराव कदम साहेबांच्याकडं घेऊन गेलो. साहेबांची कवठेपिरान इथं हिंदकेसरी मारुती माने यांच्याबरोबर सभा चालू होती. मी स्टेजवरच त्याला साहेबांच्याकडं घेऊन गेलो. साहेबांनी त्याला कुठला आहे, तेवढंच विचारलं आणि त्याची दुसऱ्या वर्षाची अर्धी फी माफ केली. त्याला फायनान्समध्ये गती होती. शेअर मार्केटचा तो चांगला अभ्यास करत होता. पुढं माझी बदली पुण्याला, दिल्लीला आणि कोल्हापूरला झाली आणि त्या मुलाशी माझा संपर्क तुटला पण तो शेअर ब्रोकिंगचं काम करतोय असं मला कळालं.
आज माझ्याच एका छोट्या कामासाठी मी त्याचा फोन नंबर हुडकून त्याला फोन केला. त्याला खूप आनंद झाला. त्यानं मला घरी बोलावलं. मी गेलो. त्याचं आजचं वैभव पाहून माझं डोळं भरून आलं. आम्ही एकमेकांना मिठी मारून अश्रुंना वाट करून दिली. काही कोटींचा बंगला, सुविद्य पत्नी, दोन मुलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आलिशान घराला शोभा आणणारे गोमेवाडीतील त्याचे आई-वडील. हे सर्व पाहून मन खूप आनंदलं. त्यानं मला त्याच्या खुर्चीवर बसवून माझ्यासोबत फोटो काढला, तसंच आदरानं नमस्कार केला. त्यानं साहेबांनी केलेल्या मदतीचाही उल्लेख केला, तसंच मी जामीन राहिल्यामुळं त्याचं शिक्षण कसं पूर्ण झालं हे त्यानं त्याच्या पत्नीलाही सांगितलं. आज तो यशस्वी जीवन जगत आहे. त्याच्या कामाचा पसारा देशभर आहे. या माझ्या विद्यार्थ्याचं नाव आहे,धनाजी दबडे
मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण अशा अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करून, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना आयुष्यात यशस्वी केलं. माझ्यासारख्या शिक्षकाच्या आयुष्यात यापेक्षा आनंदाचा कोणता क्षण असू शकतो ?धनाजी दबडे आणखीन मोठे व्हा!
नितीन नायक सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.