Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रदीप शर्मा यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

प्रदीप शर्मा यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

अँटिलिया व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर करीत त्यांच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती नरसिम्हा यांच्या खंडपीठाने जामीन अर्जावर निर्णय दिला.

अँटिलिया व मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'एनआयए' या केंद्रीय तपास यंत्रणेने सर्वोच्च न्यायालयात प्रदीप शर्मा यांच्या जामीन याचिकेवर सुनावणीदरम्यान विरोध केला. परंतु, प्रदीप शर्मा एक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांची पत्नी गंभीर आजारी असून त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद प्रदीप शर्मा यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रदीप शर्मा यांचा जामीन मंजूर करीत त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.

ठाण्याच्या खाडीत 5 मार्च 2021 ला मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. हिरेन यांच्या हत्याप्रकरणात सहभाग असल्याचे सांगत पोलिसांनी जून 2021 मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक केली होती. या अटकेनंतर स्वत: वरील सर्व आरोप प्रदीप शर्मा यांनी फेटाळले. मात्र एनआयएच्या आरोपानुसार व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य आरोपी प्रदीप शर्मा हेच आहेत; परंतु आतापर्यंत प्रदीप शर्मा यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा सापडला नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.