दुकानाच्या छतावरून साप पडला अन् दुचाकीत शिरला, बाहेर ओढून काढतानाच केला दोन वेळा दंश
सांगली : दुकानाच्या छतावरुन साप कोसळून थेट दुचाकीत शिरल्याची घटना सांगलीत घडली. दुचाकीत साप शिरल्याचे पाहिल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दंश केला. हेमंत मोरे असे त्याचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रसंग नेमका काय घडला?
कापड दुकानातील कामगाराने आपली स्प्लेंडर दुचाकी रस्त्याकडेला पार्क केली होती. याच पार्क केलेल्या दुचाकीत साप शिरला. मिरज हायस्कूल रोडवरील शगुन कापड दुकानातील कामगार हेमंतने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दुचाकी पार्क करून दुकानामध्ये बसला होता. खंदक किल्ला भाग बाजूने दुकानाच्या छतावरून अंदाजे तीन फुटाचा साप रस्त्यावर येऊन पडला.साप सरळ हेमंतच्या मोटरसायकलमध्ये शिरला हे शाळेच्या शिपायाने पहिल्यानंतर त्याने आरडाओरड करून हेमंत मोरेला बोलवून माहिती दिली. हेमंतने धाडसाने मोटरसायकलचा शीट कव्हर काढून सापाला पकडले. मात्र, साप पकडत असताना हेमंत मोरेच्या हातावर दोनवेळा सापाने चावा घेतला. सापाला सुखरूप पकडून हेमंतने नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यानंतर स्वतः उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाला.
झोपेत सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला रात्री झोपेत असताना सर्पदंश झाल्याने जत तालुक्यातील सिद्धनाथ येथील विवाहित महिलेचा मृत्यू झाला होता. सिद्धनाथमधील शिंदे वस्तीवर वास्तव्य असलेल्या सुनिता वसंत शिंदे (वय 30) ही महिला झोपली असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सर्पदंश झाला. जागी झालेल्या महिलेने ही बाब घरच्या लोकांना सांगितल्याने तिला तत्काळ जतच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
सर्पदंशाने चिमुकलीचा मृत्यू
दुसरीकडे, ऑगस्ट महिन्यात झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सावळज (ता. तासगाव) येथील प्रांजल प्रमोद माळी (वय 8) या मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला होता. रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरात विषारी सापाने प्रांजलला दंश केला. मात्र, सर्पदंश झाल्याची जाणीव झाली नाही. मात्र, काही वेळाने त्रास होऊ लागल्यानंतर उपचारासाठी सावळजमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रांजल अधिकच अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरु होण्यापुर्वीच प्रांजलचा मृत्यू झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)