40 कोटींची कॅश असलेले 21 खोके पाहून आयकर अधिकारीही चक्रावले
कर्नाटकातल्या बंगळुरुमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री आयकर विभागाने एका फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात कोटींची रक्कम जप्त केली आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या निवासस्थानावर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या फ्लॅटवर आयकर विभागाने हे छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या छाप्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या छाप्यात सापडलेली रक्कम पाहून आयकर विभागाच्या पथक स्वत: थक्क झाले आहे.
आयकर अधिकार्यांनी बेंगळुरूमधील सुलतानपल्यातील आत्मानंद कॉलनीतील एका फ्लॅटवर छापा टाकला आणि 40 कोटींहून अधिक रोख जप्त केल्याचे सांगितले जात आहे. कंत्राटदार आर अंबिकापथी आणि त्यांच्या माजी नगरसेविका पत्नी अश्वथम्मा यांच्या फ्लॅटवर हा छापा टाकला गेल्याची माहिती समोर आली आहे. आयकर अधिकार्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा पोलिस कर्मचार्यांसह फ्लॅटवर छापा टाकला आणि 40 कोटींहून अधिक रोख असलेले 21 हून अधिक बॉक्स जप्त केल्याचे सांगण्यात आले. आयकर विभागाला खोलीत पलंगाखाली एकदाही न वापरलेल्या पैशांनी भरलेले सुमारे 21 बॉक्स सापडले. हे पैसे शेजारच्या राज्यात पोहचवले जाणार होते अशीही माहिती समोर येत आहे.
अंबिकापथी हे कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. कर्नाटकात राजकीय खळबळ माजवणाऱ्या मागील भाजपा सरकारवर असोसिएशनने घोटाळ्याचे आरोप केले होते. अंबकापथी यांच्या पत्नी अश्वथम्मा या प्रभाग क्रमांक 5 च्या माजी नगरसेविका आहेत. आयकर अधिकाऱ्यांना फ्लॅटमध्ये बँक खाती आणि लॉकर्सची कागदपत्रे सापडल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळी दहाच्या सुमारास अधिकारी या दाम्पत्याच्या लॉकर्सची झडती घेण्याची शक्यता आहे. हे जोडपे बेंगळुरूमधील एका माजी काँग्रेस आमदाराचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीच्या आधारे, शोध आणि जप्तीसाठी आयकर विभागाची स्वतंत्र पथके इतर विविध ठिकाणी पाठवली जात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.