Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार; गुन्हा दाखल

धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार; गुन्हा दाखल


पुणे: शिक्षणाचं माहेरघर आणि शांतताप्रिय शहर म्हणून पुण्याची ओळख आहे, पण काही वर्षांपासून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे आता पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या कारवायांनंतरही पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होताना दिसून येत नाही. कोयता गँगचा उपद्रव, बलात्कार, विनयभंग, खून, दरोडे यांसारख्या गुन्हेगारींच्या घटनांनी डोके वर काढले आहे.

पुण्यासह राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून एकीकडे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली जात आहे. याचवेळी पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांत पीडित नगरसेविका महिलेने फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपू्र्ण संबंध होते. या मैत्रीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करण्याची आरोपी सचिन काकडे याने महिलेला धमकी दिली. तसेच मैत्रीपूर्ण संबंधाची पतीला माहिती देण्याची धमकी देत आरोपीने माजी नगरसेविका महिलेवर वारंवार बलात्कार केला. २०१७ पासून नगरसेविकेला धमकावून काकडेने अत्याचार केले होते. नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी दहा लाख रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यादरम्यान, दोन दिवसांपूर्वी आरोपी सचिन काकडे तिच्या घरी आला. 'तू दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे,' असे सांगून त्याने तिला मारहाण केल्याचेही पोलिसांत तक्रार दाखल केलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे.

पीडित माजी नगरसेविका असलेल्या महिलेने अखेर आरोपी सचिन काकडेच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाणे गाठले. पोलिस उपनिरीक्षक सचिन निकाळजे तपास करत आहेत. एका माजी नगरसेविका महिलेवरील बलात्काराच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.