Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी लोक जाईनात, दोनशेपैकी साठ बस रद्द; ज्या गेल्या त्याही रिकाम्या

मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी लोक जाईनात, दोनशेपैकी साठ बस रद्द; ज्या गेल्या त्याही रिकाम्या


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीतीत मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या उद्याच्या दसरा मेळाव्याला लोकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.  राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून २५ हजार लोक नेण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात लोक मेळाव्याला जाण्यास उत्सूक नसल्याने दोनशे पैकी ६० बस रद्द करण्याची वेळ सत्तारांवर आली.

उर्वरित १४० बसेसही जेमतेम अर्ध्या भरल्या. उद्या सकाळी लोक आझाद मैदानात पोहचले पाहिजे त्यामुळे या अर्ध्या भरलेल्या बसेसच मुंबईकडे रवाना करण्यात आल्या आहेत. गर्दी जमवण्यात हातखंडा असलेल्या अब्दुल सत्तार  यांना यावेळी मात्र त्यात अपयश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्याची मोठी जबाबदारी दिली होती.

गेल्या दसरा मेळाव्याला मुंबईत सर्वाधिक गर्दी ही अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातूनच झाली होती.  त्यामुळे यदांही तशीच किंवा त्यापेक्षा जास्त गर्दी सत्तार यांच्याकडूनच केली जाईल, अशी अपेक्षा होती.  परंतु मराठा आरक्षणासाठी पेटलेले आंदोलन, त्यात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री, आमदार, खासदारांना गावबंदीची केलेली घोषणा याचा मोठा फटका अब्दुल सत्तार यांना बसल्याचे दिसून आले.

समाज माध्यमांवरही राजकीय नेत्यांच्या सभा, मेळाव्याला मराठा बांधवांनी जाऊ नये, असे आवाहन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. त्याचा परिणामही सत्तार यांनी केलेल्या बसेस रिकाम्या जाण्यात झाला आहे. सत्तार यांनी दरवेळी प्रमाणे यंत्रणा कामाला लावली, दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्वांची योग्य ती सोय करण्यात आली होती. सिल्लोड येथील अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयासमोरील मैदानात सकळी दहावाजेपासून शेकडो बसेस दसरा मेळाव्याचे बॅनर आणि भगवे झेंडे लावून तैनात करण्यात आल्या होत्या.

पण मुंबईला रवाना होण्याचीवेळ झाली तरी लोक येत नसल्यामुळे अखेर ६० बस रद्द करण्यात आल्या. सिल्लोड आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून अशा एकूण १४० बसेस मुंबईकडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु या बसेसही पुर्ण भरल्या नाहीत. अब्दुल सत्तार यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी दोनशे बस बूक करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात आज १४० मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. या सर्व गाड्यांच्या चालकांना लाॅगशीट तयार करून देण्यात आले असून ते रवाना झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.