ED चा धडाका! गेल्या चार वर्षांत जप्त केली 69 हजार कोटींची मालमत्ता, सरकारची राज्यसभेत माहिती
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गेल्या चार वर्षांत मनी लाँड्रिंगच्या विविध तपासासंदर्भात 69,000 हजार कोटींहून अधिक किमतीच्या गुन्ह्यांची मालमत्ता जप्त केली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत दिली. ईडीने 1 जानेवारी 2019 पासून चार फरारी लोकांना भारताकडे प्रत्यार्पण करण्यात यशस्वी झाली आहे. ही माहिती केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आहे.
"गेल्या चार वर्षांमध्ये (1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023), महसूल विभागाच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 अंतर्गत 69,045.89 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे," असे सिंग म्हणाले.
ते भारतीय जनता पक्षाचे खासदार सुशील कुमार मोदी यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते, ज्यांनी गेल्या चार वर्षांत आर्थिक गुन्हेगार आणि फरारी लोकांकडून जप्त केलेली एकूण संपत्ती याविषयी प्रश्न उपस्थिती केला होता. बिहारमधून राज्यसभा सदस्य असलेल्या मोदी यांनी 2014 पासून पीएमएलए आणि फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत जप्त केलेली एकूण मालमत्ता देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला."1 जानेवारी 2014 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत, ED ने तात्पुरत्या स्वरूपात 1,16,792 कोटी रुपयांची आणि PMLA अंतर्गत 16,637.21 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे," असे सिंग यांनी आपल्या उत्तरात सांगितले आहे.पुढे पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या उत्तरात सांगितले की, "16,740.15 कोटी रुपयांची मालमत्ता फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 अंतर्गत जप्त करण्यात आली आहे." गेल्या चार वर्षांत गुन्हेगार आणि पळून गेलेल्या आरोपींच्या प्रत्यार्पणाच्या संख्येबद्दल स्वतंत्र प्रश्नावर, सिंग म्हणाले की, "ईडीने 2019 पासून चार व्यक्तींचे प्रत्यार्पण केले आहे. आणखी तीन व्यक्तींच्या प्रत्यार्पणाचे आदेश सक्षम न्यायालयांनी पारित केले आहेत," असे सिंग यांनी पुढे सांगितले.
ऑगस्टमध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान, सरकारने संसदेला कळवले होते की 2018 पासून 10 लोकांना फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते. या यादीत विजय मल्ल्या, नीरव मोदी, संदेसरा बंधू नितीन आणि चेतन आणि चेतनची पत्नी दिप्ती यांच्या नावांचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.