जयश्री पाटील अजितदादांच्या भेटीला; काँग्रेस फुटणार ?
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा, काँगेसच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये वीस मिनिटे चर्चा झाल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, माजी महापौर सुरेश आवटी, स्वाती पारधी, हणमंत पवार, नितीन शिंदे, गजानन मगदूम यांनीही अजितदादांची भेट घेतली. सुरेश पाटील व स्वाती पारधी यांचा प्रवेश निश्चित झाला असून मुंबईत पक्ष प्रवेश करणार आहेत.
महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादीला (शरद पवार गट) खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांवर उपमुख्यमंत्री पवारांनी गळ टाकला आहे. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, इद्रिस नायकवडी, विष्णू माने, पद्माकर जगदाळे, जमील बागवान यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे, तर मैनुद्दीन बागवान, विष्णू माने यांच्यासह अन्य काही माजी नगरसेवकही अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीदेखील भेट घेतली होती. त्यांचा पक्ष प्रवेश ५ फेब्रुवारीला मेळाव्यात होणार आहे. त्यामुळे अजितदादा गटाकडे मनपा क्षेत्रातून जोरदार इनकमिंग सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटलांनी अजित पवारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला उधाण आले आहे. मात्र त्यांनी ही भेट हाउसिंग फायनान्सच्यासंदर्भातील असल्याचा खुलासा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. राष्ट्रवादीचे माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी अजितदादांची भेट घेतली. त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मुंबईत त्यांचा प्रवेश होणार आहे.
कुपवाड येथे भाजपने सहयोगी सदस्य गजानन मगदूम यांच्या प्रयत्नाने (स्व.) मदनभाऊ पाटील यांच्या नावाने मिनी स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियमचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते ५ फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटनही ते करणार आहेत. माजी आमदार (स्व.) शरद पाटील यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत, तर माजी नगरसेवक विष्णू माने, हणमंतराव पवार, सामाजिक कार्यकर्ते तथा कबड्डीपटू नितीन शिंदे यांच्यासह अन्य राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांनीदेखील अजित पवार यांची भेट घेतली.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण काम करण्यास इच्छुक आहेत. माजी महापौरांसह अनेक माजी नगरसेवकांचा प्रवेश निश्चित झाला आहे. फेब्रुवारीमध्ये पवार सांगालीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांचा प्रवेश होईल. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.