Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जरांगेंना दिली जाणारी औषधे-ज्यूस तपासून द्या त्यात धोका होऊ शकतो : प्रकाश आंबेडकरांना घातपाताचा संशय

जरांगेंना दिली जाणारी औषधे-ज्यूस तपासून द्या त्यात धोका होऊ शकतो : प्रकाश आंबेडकरांना घातपाताचा संशय

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत घातपात होण्याची भीती व्यक्त करत सरकारला याबाबत आवाहन केलं आहे.

"ज्या प्रकारे जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे अनेकांना धक्का लागण्याची शक्यता आहे. त्या धक्क्यापोटी अनेकजण धास्तावलेले आहेत. जरांगे पाटील हे टोकाची भूमिका घेत आहेत, हे आता समोर आलं आहे. तेव्हा त्यांना देण्यात येणारे मेडिसिन किंवा ज्यूस हे आधी तपासावेत आणि नंतरच त्यांना देण्यात यावेत. शासन ही व्यवस्था करेल, अशी मी अपेक्षा करतो. जरांगे पाटील यांनी निजामी मराठ्यांना आव्हान दिल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांची दक्षता घेणं गरजेचं आहे. जरांगेंच्या आंदोलनामुळे मोठी राजकीय उलथापालथ होईल, असं मला स्पष्टपणे दिसत आहे," असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या निर्णयाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला राजकीय लढा केला पाहिजे. कुणबीच्या संदर्भातील मागणी मान्य झाल्याचं दिसत आहे. आता गरीब मराठ्यांच्या संदर्भातील प्रश्न शिल्लक राहिला आहे. सरकार म्हणत आहे की शिंदे आयोगावर तो प्रश्न अवलंबून आहे.

२० तारखेला विशेष अधिवेशन बोलावलं आहे. विशेष अधिवेशनाचा मसुदा काय आहे तो अजून सरकारने सादर केलेला नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यामध्ये आहे का, हे कळायला मार्ग नाही. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार यांच्या नावाने अनेक संघटना निघाल्या, पण त्या निजामी मराठ्यांनी जिरवून टाकल्या. जरांगे पाटलांना एवढंच सांगतो की २० दिवसांच्या आतमध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागली की कोणताही निर्णय होणार नाही," असं म्हणत आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 

दरम्यान, "राजकीय पक्ष हे देशाच्या एकसंधतेचे प्रतिनिधित्व आहे, असे आम्ही मानतो. पक्ष संपला, तर मग देशात एकता दाखवण्याचे माध्यम संपवण्याचे काम हे नार्वेकरांनी बौद्धिकतेने केले. हा देशावर परिणाम करणारा निर्णय राहणार आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा चर्चेचा विषय राहील, असं मी मानतो," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.