"शरद पवार गटच नाही तर उबाठाही काँग्रेसमध्ये जाणार!"
मुंबई : शरद पवार गटच नाही तर उबाठा गटही काँग्रेसमध्ये विलिन करावा, अशी अंतिम टप्प्यातली चर्चा सुरु असल्याची माहिती मातोश्रीच्या अतिशय निकटवर्तीय व्यक्तीने मला दिली आहे, अशी माहिती भाजप आमदार नितेश राणेंनी दिली आहे.
गुरुवारी सकाळी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत हे वक्तव्य केले आहे. नितेश राणे म्हणाले की, "शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होऊ शकतो, अशी बातमी सकाळपासून सुरु आहे. पण ही अर्धीच बातमी असल्याची माहिती मातोश्रीच्या अतिशय निकटवर्तीय व्यक्तीने मला दिली आहे. कारण पुढचा टप्पा असा आहे की, नुसता शरद पवार गटच नाही तर उबाठा गटही काँग्रेसमध्ये विलिन करावा, अशा पद्धतीची अंतिम टप्प्यातली चर्चा सुरु आहे. जेणेकरुन येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंचे आणि शरद पवारांचे सगळे उमेदवार हे हाताच्या चिन्हावर लढतील."
ते पुढे म्हणाले की "महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा काँग्रेस झाला तर मी माझं दुकान बंद करुन टाकेन असं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे आता काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढतील. भाजपला ४०० पार मी होऊ देणार नाही हे आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आधी स्वत:च्या अस्तित्वाबद्दल विचार करावा आणि मगच आमच्यावर बोलावं. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या निमित्ताने भाजपशी गद्दारी करण्याची जबाबदारी, उद्धव ठाकरेंचं मन तयार करण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राच्या जनमताशी गद्दारी करण्याची जबाबदारी जशी संजय राजाराम राऊतांना दिली होती, तशीच उद्धव ठाकरेंना काँग्रेसमध्ये विलिन करुन घेण्याची सुपारीदेखील राऊतांनाच दिली आहे, हे येणाऱ्या काही दिवसांत नक्कीच कळेल," असे ते म्हणाले.
तसेच उबाठा गटाचे मशाल हे चिन्ह केवळ अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंतच मिळालेलं आहे. लोकसभेसाठी त्यांना वेगळं चिन्ह निवडावं लागेल. हीच अवस्था शरद पवार गटाचीदेखील आहे. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आता उद्धव ठाकरे का साथ काँग्रेसके हाथ में अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.