Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विद्यार्थ्याच्या खिशात पोलिसांनीच ठेवले ड्रग्जचे पाकीट, उकळले ५ लाख! दोन पोलीस कर्मचारी फरार

विद्यार्थ्याच्या खिशात पोलिसांनीच ठेवले ड्रग्जचे पाकीट, उकळले ५ लाख! दोन पोलीस कर्मचारी फरार 

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन एका १९ वर्षीय विद्यार्थ्याकडून ४.९८ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे या घटनेत दोन पोलिसांचा समावेश आहे.पीडित विद्यार्थ्याने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून देहू रोड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजवळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.त्यांच्यासह अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमर मिर्झा, शंकर गोर्डे, मुन्ना स्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (१९) असे तक्रारदाराचे नाव आहे.तक्रारदार वैभवसिंग हा मूळचा झारखंडचा असून सध्या पुण्यातील किवळे येथे राहायला आहे.तरुणाने देहू रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमर मिर्झा यांना पोलिसांनी अटक केली.

पोलीस आयुक्त बाबू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वैभवसिंग चौहान हा किवळे येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. तेव्हा त्याची आरोपी अमन शेख याच्याशी ओळख झाली.आरोपी अमनने देहू रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे आरोपी पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजवळ यांची मदत घेत वैभवसिंगला अंमली पदार्थ विक्रीच्या खोट्या कटात फसवण्याची योजना आखली.

त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थ्याला कॅफेमध्ये बोलावले आणि त्याच्या खिशात ड्रग्जचे पॅकेट ठेवले.त्यानंतर आरोपी पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याची तपासणी केली.त्यावेळी विद्यार्थ्याकडून ड्रग्सचे पाकीट सापडले.त्यानंतर बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ​​आरोपी पोलिसांनी २० लाख रुपयांची मागणी केली.घाबरलेल्या विद्यार्थ्याने आरोपीच्या खात्यात ४.९८ लाख रुपये ट्रान्सफर केले.

दरम्यान, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस देहू रोड पोलीस ठाणे गाठत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच आरोपी असलेले दोन पोलीस कर्मचारी सध्या फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.