Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कडेगावात 37 लाख रुपयाचा युरियाचा साठा जप्त


कडेगावात 37 लाख रुपयाचा युरियाचा साठा जप्त 

कडेगाव एमआयडीसी येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईत ३७ लाख ८९ हजार ७७९ रुपयांचा जवळपास २१० टन संशयित बेकायदेशीर युरियाचा साठा जप्त करण्यात आला आहे. कडेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल सुकुमार बिरनाळे यांनी फिर्याद दिली आहे.


गोदाम मॅनेजर शंकर जगन्नाथ काळे (वय ५३, रा.आटके ता.कराड जि.सातारा) याचे विरुद्ध कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पंचायत समिती कडेगाव व कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,कडेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत नियंत्रण निरीक्षक राहुल सुकुमार बिरनाळे व खत नियंत्रण निरीक्षक तथा कडेगाव तालुका कृषी अधिकारी बुकेश्वर प्रकाश घोडगे व कडेगावचे पोलिस उपनिरीक्षक यू. आर. काळे यांनी कडेगाव एमआयडीसीमधील प्लॉट नं.ए ३८ मधील गोदामात तपासणी केली.

गोदामात कृषी वापराच्या युरियाच्या ४५ किलोच्या २ हजार ७२९ बॅगा आढळल्या. यावेळी औद्योगिक वापराच्या बॅगमध्ये युरिया असलेल्या ५० किलोच्या एक हजार ३५० बॅगा आढळून आल्या. या वेळी गोदामाच्या समोर उभा असणाऱ्या ट्रक (एमएच ०४ जीआर ३००४) मध्ये ५० किलोच्या ४०० बॅगा आढळून आल्या.

हा ट्रक युरियाच्या बॅगा भरून वाहतुकीसाठी तयार असल्याचे दिसून आले. येथील गोदाम मॅनेजर शंकर जगन्नाथ काळे याने रासायनिक युरिया खताचे मूळ वेस्टन फोडून तो कारखान्याच्या वापराकरिता देण्यात येणाऱ्या वेस्टनमध्ये भरून शिलाई करून ट्रकमध्ये भरल्याचे आढळून आले. येथे कृषी व औद्योगिक वापराचा युरिया एकूण ४ हजार ४७९ बॅगांचा साठा आढळला.

औद्योगिक कामासाठी अनधिकृत वापर

गोदामात युरीया खताच्या २ हजार ७४२ रिकाम्या बॅगाही आढळल्या आहेत. युरिया खत शेतीव्यतिरिक्त इतर औद्योगिक कामासाठी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे वापरले जात असल्याची शक्यता बळावली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.