Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लहान मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

लहान मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

जालना : आजकाल जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल असतो. पालक अगदी लहान वयातच आपल्या मुलांना खेळण्यासाठी मोबाईल देतात. यात रमताच मुलं रडणं किंवा त्रास देणं बंद करत असल्यानं अनेक पालक आजकाल हा पर्याय निवडतात. मात्र, या गोष्टीचा जेवढा फायदा आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक तोटे आहेत. सध्या जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावात घडली आहे. समर्थ परशुराम तायडे असं या मयत झालेल्या बालकाचं नाव आहे. कुंभारी या ठिकाणी एका नातेवाईकाचा तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाला होता. कार्यक्रम आटोपून 4 मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमठाणा येथे परतणार होतं. घरी परतण्यापूर्वी त्यांचा मुलगा समर्थ हा इतर मुलांबरोबर खेळत होता. खेळताना चिमुकल्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि त्याचा जीव गेला.


खेळत असताना मोबाईलची खराब बॅटरी या 5 वर्षीय मुलाने कानाला लावली. त्याच क्षणी त्याचा अतिशय भयानक स्फोट झाला. यात समर्थच्या कानाला आणि हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केलं.यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पंचनामा भोकरदन पोलिसांकडून करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.