Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अक्षरातलं 'अ ' येत नसताना ही पुढ्याऱ्यांची बोलीती बंद करणाऱ्या कचरा वेचक सुरुबाईच्या बुलंद कहाणी

अक्षरातलं 'अ ' येत नसताना ही पुढ्याऱ्यांची बोलीती बंद करणाऱ्या कचरा वेचक सुरुबाईच्या बुलंद कहाणी 


अक्षरातलं अ येत नसतानासुद्धा तब्बल पाच हजारांहून अधिक गाण्यांची रचना पुण्यातील सरुबाई वाघमारे यांनी केली आहे. केवळ रचनाच करूनच त्या थांबल्या नाहीत तर, अगदी परदेशात जाऊन त्यांनी त्यांच्या स्वरचित गाण्यांचे गायन केले आहे.

त्यांच्या या कृतत्वातून खऱ्या अर्थाने त्या प्रति बहिणाबाई ठरल्या आहेत. पुण्यात त्या कचरावेचकाचे काम करतात. पुण्यातील रस्त्यांवरील कचरा वेचत वेचत त्यांनी शाहिरी ही लोककला जपली आहे. त्यामुळे त्यांची कचरावेचक लोककलावंत अशीही नवी ओळख निर्माण झाली आहे.

निरक्षर असलेल्या सरुबाई वाघमारे यांनी मुक्ता साळवे यांच्या नावाने घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. पुण्यातील कुंभारवाड्याकडून महापालिकेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील झोपडपट्टीत सरुबाई वाघमारे राहतात. त्यांच्या गाण्यांच्या निर्मितीबाबत आणि लोककलावंत म्हणून नावारूपाला येण्याबाबत सांगताना सरुबाई वाघमारे म्हणाल्या," मी लहान असताना आजीसोबत भजनाला जात होते. मला त्याची आवड निर्माण झाली. माझे अनेक अभंग पाठ झाले. नंतर माझे लग्न झाल्यावर भजनाला जाणे कमी झाले. पण कुठे गाणे, संगीत ऐकले की जीव हुरहूर व्हायचा. काम थांबवून गाणे ऐकावे असे वाटायचे.

मी आणि माझा नवरा कागद, काच, पत्रा गोळा करायचो. रस्त्यावर फिरताना कोठेही संगीत ऐकलं की बरे वाटायचे. एक दिवस अशीच बसले असताना मला एक ओळ सुचली आणि त्याच वेळी 'साजन' चित्रपटातील एक गाणे कानावर पडले. मग त्याच चालीवर गाण्यांचे एक कडवे तयार केले. हे कडवे गुणगुणत पाठ केलं. दुसऱ्या दिवशी अख्खं गाणं तयार झालं. मग ते गाणं जपून कस ठेवायचे, हा प्रश्न मला पडला. कारण मला वाचायला, लिहायला येत नव्हतं. मग मी या गाण्याबाबत नवऱ्याला सांगितले. नवऱ्यालाही कौतुक वाटलं. त्यांनी गाणं लिहून घेतलं. मग मी अधूनमधून सिनेमाच्या चालीवर गाणी रचू लागले. माझा नवरा ती गाणी लिहून ठेवू लागला. मी झोपडीपट्टीतील लोकांचं जगणं, तिथले प्रश्न, दारूबंदी, पुढाऱ्यांकडून लोकांची होणारी फसवणूक, पुरोगामी चळवळ या विषयांवर गाणी रचू लागले. ही घटना साधारण १९९४-९५ मधील असेल." दरम्यान, सन याच दरम्यान १९९५ मध्ये आमच्या कागद काच पत्रा संघटनेचा एक मोर्चा होता.

या मोर्चात मी पहिल्यांदा लोकांच्या समोर जाऊन माझे गाणे म्हटले. माझ्यासोबत असलेल्या कागद,पत्रा गोळा करणाऱ्या महिलांना खूप आश्चर्य वाटले. त्या माझे कौतुक करायला लागल्या. सहकारी महिलांच्या कौतुकांमुळे मला गाणी रचायला हुरूप आला. आणि मी गाणी रचू लागले आणि गाणी गायनही करू लागल्याचे सरुबाई वाघमारे सांगत होत्या. सरूबाईच्या गाण्याचे विषय सामाजिक आहेत. यामध्ये प्रामुख्याने दारूबंदी, हुंडाबंदीवर लिहिलेल्या गाण्यांचा समावेश आहे. त्यांनी हुंडाबंदीवर लिहिलेले गाणे "आंटीने वाजवली घंटी'या चित्रपटाच्या चालीवर आहे. सरूबाई जातील त्या कार्यक्रमात हे गाणे गाऊन लोकांना ठेका धरायला लावतात.'आम्ही तुम्हाला निवडून दिलं, सांगा तुम्ही ओ काय काय केलं?' हे त्यांचं पुढाऱ्यांना सवाल विचारणारे गाणेही अनेकंच्या मुखी बसलेले आहे. सरूबाई गाणी रचत होत्या. गाणं रचता रचता त्या विविध कार्यक्रमात त्यांचे गाणे गातही असतं. असाच एक कार्यक्रम सुनंदा पवार यांनी बारामतीत आयोजित केला होता.

या कार्यक्रमात त्यांनी त्यांची काही गाणी गायली. त्यानंतर त्या खऱ्या अर्थाने लोकांसमोर आल्या. या कार्यक्रमानंतर सरुबाईंना अनेक ठिकाणांहून बोलावणे यायला लागले आणि लोककलेच्या कार्यक्रमाला त्या जाऊ लागल्या. सरूबाई या एक लोककलावंत, लोकशाहीर आणि लोककवी आहेतच. पण त्यांच्या दैनंदिन जगण्याची लढाईसुद्धा तेवढीच खडतर आहे. त्या सकाळी लवकर उठल्या की नवऱ्यासोबत कचरा गोळा करायला जातात. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारी ही लोककलाकार आहे. त्यांनी कचऱ्यावरही लिहिले आहे. त्यात त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. सरूबाईच्या कामामुळे आणि आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे अमीरखान यांच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात त्यांचा सत्कार झाला आहे. शिवाय त्यांनी आतापर्यंत अमेरिका, जर्मनी, थायलंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील आदींसह विविध देशांत जाऊन त्यांची कला सादर केली आहे. तसेच कचऱ्याच्या व्यवस्थापनावर होणाऱ्या कार्यशाळेसाठी त्या दहा ते बारा देशांमध्ये जाऊन आलेल्या आहेत. त्या कागद काच पत्रा पंचायत या संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. या संघटनेतील लोकांमुळेच आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांच्यामुळेच माझ्या आयुष्याला दिशा मिळाल्याचे सरुबाई वाघमारे सांगत होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.