Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरात घुबडाची तस्करी करणाऱ्याला अटकराजारामपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापुरात घुबडाची तस्करी करणाऱ्याला अटकराजारामपुरी पोलिसांची कारवाई


कोल्हापूर :  शहरातील राजारामपुरीतील वैभव सोसायटी परिसरात अघोरी कृत्यासाठी घुबडाची तस्करी करून त्याची विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून घुबड आणि दुचाकी जप्त जप्त करण्यात आली आहे. घुबड वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.  


सौरभ नामदेव पाटील (वय २३, रा. नाना पाटील वाडी, दुर्गमानवाड, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू, पैसे तसेच अन्य पदार्थाची तस्करीवर नजर ठेवून कारवाई करण्याच्या सूचना निरीक्षक तनपुरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या आहेत. राजारामपुरीतील वैभव सोसायटी परिसरात एक तरूण संरक्षित प्रजाती असलेल्या घुबड या पक्षाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती निरीक्षक तनपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. 

पथकाने वैभव सोसायटीतील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला होता. त्यावेळी एक तरूण दुचाकीवर एक पुठ्ठ्याचा बॉक्स घेऊन थांबल्याचे दिसून आले. पथकाला संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन बॉक्सची तपासणी केल्यावर त्यामध्ये करड्या रंगाचे घुबड आढळून आले. वनविभागाच्या मदतीने पक्षी ताब्यात घेऊन तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडील दुचाकीही जप्त करण्यात आली. 

कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास अडसूळ, हरीष सूर्यवंशी, देवानंद बल्लारी, बाजीराव विघ्ने, करवीरचे वनपाल शैलेश शिवडे, वनरक्षक रूकेश मुलाणी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.