हातकणंगलेत महायुतीने पुढे आणला नवा चेहरा; 'या' नावांची चाचपणी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीच्या अनुंषगाने रोज नवनवीन नावे पुढे येत आहेत. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल असलेल्या नाराजीमुळे उमेदवारी बदलाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. महायुतीतून आतापर्यंत खासदार धैर्यशील माने, 'गोकुळ'च्या संचालिका शौमिका महाडिक आणि पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांच्या नावावर चाचपणी सुरू झाली आहे. मतदारसंघातील जातीय समीकरणावरच येथील माहितीचा उमेदवार ठरणार आहे. त्या दृष्टीने महायुती जबाबदारीने पावले टाकत आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा कायम असला तरी सध्या ही जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दोनपैकी एक जागा भाजप घेण्याच्या तयारीत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजले जाते. मात्र, ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, यावर सर्व काही अवलंबून आहे. दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या चिन्हावर भाजपचा उमेदवार लढणार की भाजप स्वतंत्र उमेदवार देणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
भाजपची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार असल्याने महायुतीमध्ये हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार बदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. आमदार विनय कोरे यांच्यासह संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर मुंबईत चर्चा झाली आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने डॉ. संजय पाटील हे नाव नव्याने चर्चेत आणले आहे.
संजय पाटील यड्रावकर हे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू आहेत. संजय पाटील यड्रावकर यांचं नाव अचानक चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विद्यमान धैर्यशील माने यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याने आयत्या वेळी नव्या नावावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. जातीय समीकरण लक्षात घेत संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर खल झाल्याची माहिती आहे.संजय पाटील यांनी जयसिंगपूर ही नगरपरिषदेची निवडणूक लढवल्यानंतर ते काही काळ नगराध्यक्ष होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निमित्ताने त्यांचा शिरोळ विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क मोठा आहे. एक मराठा उमेदवार म्हणून महायुतीमध्ये संजय पाटील यांच्या नावावरही चर्चा झाली असून, पण शेवटी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत होऊन उमेदवारी दिली जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.