प्रेमप्रकरणातून कॉलेज तरुणीचा गळा दाबून खून
जत येथे प्रेमप्रकरणातून महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अक्षता सदाशिव कोरे (वय २१, रा. सैनिकनगर, जत) या युवतीचा गळा आवळून खून करण्यात आला. महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडीक जागेत अक्षताचा मृतदेह आढळला. याप्रकरणी जत पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे (१९, रा. शिवाजी पेठ, जत) याला ताब्यात घेतले आहे. खुनाच्या नेमक्या कारणाचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बीए भाग एकमध्ये अक्षता शिकत होती. तिचे वडील कापड व्यापारी आहेत. सोमवारी सकाळी सात वाजता वडील तिला महाविद्यालयात सोडून गेले. साडेअकरा वाजता महाविद्यालय सुटते. मात्र, दुपारी तीन वाजले तरी अक्षता घरी आली नाही म्हणून नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडक्या इमारतीत काही गुराख्यांना मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली. खुनाची घटना दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. अक्षताचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी जत पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे (१९, रा. शिवाजी पेठ, जत) याला ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पंचनाम्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून अक्षताचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. मृत अक्षताचा भाऊ सागर सदाशिव कोरे यांनी फिर्याद दिली आहे.
रितू खोकर यांची भेट
खुनाचा प्रकार उघडकीस येताच जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच श्वान पथक, ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारीदेखील दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे संशयित निखिल कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आठवड्यातील दुसरी घटना
खुनाची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी भरदिवसा गजबजलेल्या सोलनकर चौकात खून झाला होता. त्यानंतर हा दुसरा खून निर्जन अशा वाड्यात झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.