Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एचआयव्ही विषाणू मानवी पेशीतून कात्रीने कापून काढल्यासारखा कापून काढणं शक्य, शास्त्रज्ञांचा दावा

एचआयव्ही विषाणू मानवी पेशीतून कात्रीने कापून काढल्यासारखा कापून काढणं शक्य, शास्त्रज्ञांचा दावा

एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या पेशींमधून एचआयव्ही विषाणू दूर करण्यात यश मिळालं असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या क्रिस्पर जीन- एडिटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून हे यश मिळवल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. वरवर पाहता हे तंत्रज्ञान कात्रीसारखं काम करतं. पण सूक्ष्म पातळीवर विचार करता हे डीएनएला कापून त्यातून संक्रमित खराब भाग काढून टाकतं किंवा निष्क्रिय करतं. त्यामुळं शरिरातून एचआयव्हीचे विषाणू पूर्णपणे नष्ट करता येतील अशी आशा निर्माण झाली आहे. पण तरीही हे तंत्रज्ञान किंवा उपचार पद्धती परिणामकारक आणि सुरक्षित आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी खूप चाचण्या आणि काम करावं लागणार आहे.

एचआयव्हीसाठीच्या सध्याच्या औषधांद्वारे विषाणूला रोखण्यात यश मिळतं. पण त्याद्वारे विषाणू शरिरातून नष्ट करणं शक्य नाही. युनिव्हर्सिटी ऑफ अॅमस्टरडॅमच्या एका टीमनं नुकत्याच झालेल्या वैद्यकीय परिषदेत एक शोधनिबंध सादर केला. त्यात त्यांनी सुरुवातीच्या निष्कर्षांची माहिती दिली. त्यांनी केलेलं काम सध्या केवळ एका संकल्पनेपुरतं मर्यादीत आहे, असं त्यांनी म्हटलं. तसंच नजीकच्या काळात लगेच एचआयव्हीवर उपचार सापडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसंच नॉटिंघम विद्यापीठातील स्टेम सेल आणि जीन थेरपी टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ.जेम्स डिक्सन यांनी या निष्कर्षांची अजूनही पूर्णपणे तपासणी गरजेची असल्याचं म्हटलं आहे. "भविष्यातील उपचारांचा विचार करता संपूर्ण शरिरातील या पेशींच्या कृती किंवा सक्रियतेचं परीक्षण करणं गरजेचं आहे," असंही त्यांनी म्हटलं. त्यांच्या मते, "एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांच्या जीवनावर परिणाम होण्यासाठी आधी यावर मोठ्या प्रमाणावर अभ्यास होणं गरजेचं आहे."


'प्रचंड आव्हानात्मक'

इतर शास्त्रज्ञही एचआयव्हीच्या विरोधात क्रिस्परचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक्सिशन बायथेरॅप्युटिक्सच्या मते, 48 तासांनंतरही तीन व्हॉलंटियर्सवर याचे काहीही दुष्परिणाम पाहायला मिळालेले नाहीत. मात्र, लंडनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्युटमधील विषाणू तज्ज्ञ डॉ. जोनाथन स्टोय यांच्या मते, शरिरातील सगळ्या पेशींमधून एचआयव्ही हटवणं "प्रचंड आव्हानात्मक" आहे. "या उपचार पद्धतीमुळं उद्दिष्टाच्या व्यतिरिक्त होणारे परिणाम आणि दीर्घकालीन साईड इफेक्ट्सची शक्यता हा यातील चिंतेचा विषय आहे," असंही ते म्हणाले.

"त्यामुळं क्रिस्परवर आधारित असलेली कोणतीही उपचार पद्धती अत्यंत प्रभावी आहे असं मान्य केलं, तरी तिचा नियमित वापर सुरू होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागेल." एचआयव्हीचा विषाणू रोग प्रतिकार प्रणालीच्या स्वतःसारख्याच पेशी तयार करण्याच्या यंत्रणेवरच हल्ला करतो आणि त्या पेशींना संक्रमित करतो. तरीही प्रभावी उपचारांचा वापर करून काही रुग्ण हे सामान्यपणे जगत असतात. कारण त्यांच्या शरिरात एचआयव्हीचा डीएनए किंवा अनुवांशिक तत्वं असलं तरी औषधांमुळे सक्रियपणे नव्या विषाणूची निर्मिती मात्र होत नसते.


एचआयव्हीची लागण झालेल्या बहुतांश लोकांना आयुष्यभर अँटिरेट्रोव्हायरल थेरपी घेण्याची गरज असते. त्यांनी ही औषधं घेणं बंद केलं तर हा विषाणू पुन्हा सक्रिय होऊन जास्त समस्या निर्माण करू शकतो. अग्रेसिव्ह कॅन्सर थेरपीच्या माध्यमातून संक्रमित पेशी नष्ट केल्यानंतर काही दुर्मिळ आणि मोजक्या रुग्णांना पूर्ण बरं करण्यात यश आलं आहे. पण तसं असलं तरीही एचआयव्हीच्या उपचारासाठी त्याची शिफारस कधीही केली जाणार नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.