Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवार गटाला दणका, शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरण्यास मनाई

सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवार गटाला दणका, शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरण्यास मनाई


राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाची ऑर्डर कॉपी पेस्ट करत अजित पवार यांच्याच बाजूने निर्णय दिला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्या कांत आणि आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडले.

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या लोकप्रियतेचा वापर सुरू असल्याचा मुद्दा अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरू नका असे बजावले.

अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्हाचा वापर कसा सुरू आहे? शरद पवार यांच्या लोकप्रियतेचा वापर का केला जात आहे? ही फसवणूक आहे, असे म्हणत अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे पोस्टरही सर्वोच्च न्यायालयात दाखवले. तसेच ग्रामीण भागामध्ये घड्याळ प्रसिद्ध चिन्ह प्रसिद्ध असून शरद पवार म्हणजे घड्याळ आणि घड्याळ म्हणजे शरद पवार असे समिकरण आहे. त्यामुळे छगन भुजबळ हेच पोस्टर कायम ठेवा म्हणतात. शरद पवारांची लोकप्रियता आजही कायम असून त्यांचा फोटो व घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी अजित पवार गटाला देऊ नका अशी मागणी सिंघवी यांनी केली.

तुम्ही शरद पवारांचा फोटो का वापरत आहात? तुम्हाला एवढा विश्वास असेल तर स्वतःचा फोटो वापरत का नाही? असा सवाल न्यायमूर्ती सूर्या कांत यांनी अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंग यांना केला. यावर आमच्या पक्षाकडून हा फोटो वापरला जात नसून पक्षाचे सोशल मीडियावरील कार्यकर्ते वापरत असल्याचे म्हटले. यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला आणि तुम्ही कार्यकर्त्यांना शिस्त लावा, असे फटकारले. तसेच याला जबाबदार कोण आहे? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आली की तुम्हाला शरद पवार यांची गरज भासते. पण तुम्ही आता स्वतंत्र गट असून तुम्ही तुमचा फोटो वापरा. स्वतंत्र होण्याचा निर्णय तुम्ही स्वतः घेतला होता. त्यामुळे तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही तुम्हीच नियंत्रित करा.

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दणका देत शरद पवार यांचे नाव आणि फोटो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापरू नये, असे अजित पवार गटाने लेखी स्वरुपात न्यायालयाला सादर करावे असे निर्देश दिले. यासह निवडणुकांमध्ये कुठलाही संभ्रम होऊ नये म्हणून शक्यतो घड्याळ चिन्हाचा उपयोगही अजित पवार गटाने टाळावा, असे सर्वोच्च न्यायालयाने तोंडी सुचवले. यावर अजित पवार गटाने शनिवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करू असे म्हटले. आता पुढील सुनावणी 18 मार्च रोजी पार पडणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.