वारणावती : शिराळा तालुक्यामध्ये वणवे पेटू लागले आहेत. त्यामुळे अनेक जीवजंतूंचा र्हास होऊ लागला आहे. निसर्गसौंदर्यात भर टाकणारे अनेक डोंगर काळेठिक्कर पडू लागले आहेत. पक्ष्यांची घरटी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. त्यामुळे पाखरांचा आक्रोश मन हेलावून टाकत आहे. आगी लावणार्यांवर कोणतीही कारवाई होत नाही आणि ठोस उपाययोजनाही केल्या जात नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस वणवे लावण्याचे प्रकार वाढतच आहेत.
शिराळा तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. उंचच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आल्हाददायक वातावरण, विपुल वनसंपत्ती यामुळे परिसर नयनरम्य दिसतो. मात्र उन्हाळा सुरू झाला की येथे वणवे पेटू लागतात. परिणामी एकेकाळी हिरवेगर्द दिसणारे डोंगर काळेठिक्कर पडतात. शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील डोंगरदर्यातून काही अतिउत्साही माणसांकडून आगी लावल्या जातात. त्यामुळे शित्तूर, उदगिरी, चांदोली धरण व अभयारण्याशेजारील डोंगरदर्यांतील झाडेझुडपे यांच्यासह अनेक औषधी वनस्पती जळून खाक होतात. तसेच अनेक जीवजंतू भस्मसात होतात.
काही वाटसरूंकडून गवताला आग लावली जाते. एकदा आग लागली की ती आटोक्यात येत नाही. खास करून रात्रीच्या वेळी या आगी लावल्या जातात. त्यामुळे त्या आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वणव्यांमुळे चांदोली अभयारण्याशेजारील मणदूर, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी, जाधववाडी, खुंदलापूर या परिसरातील डोंगर काळा पडला आहे. वणवे पेटवणार्यांचा संबंधित विभागाकडून शोध घेतला जात नाही. शिवाय त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारांना ऊत आला आहे.परिसरात लागलेले वणवे आटोक्यात आणण्यासाठी संबंधित विभागाकडे कोणतीही आधुनिक यंत्रणा नाही शिवाय मनुष्यबळाचीही कमतरता आहे. त्यामुळे या आगी आटोक्यात आणण्यावर मर्यादा येतात. चांदोली तसेच शिराळा तालुक्याचे निसर्गसौंदर्य अबाधित ठेवायचे असेल, तर संबंधित विभागाने यासाठी कडक उपाययोजना करावी, वणवामुक्त गाव योजना राबवावी, प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेऊन युवकांना आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण द्यावे, शिवाय संबंधित विभाग, पर्यावरणप्रेमी यांनी गावा-गावातून पुढाकार घेऊन याबाबत जागृती करणे ही काळाची गरज आहे.
गैरसमजुतीतून लावतात आगी
डोंगराला आगी लावल्यामुळे गवत जळून त्याचे खत होते. त्यामुळे पावसाळ्यात तेथे गवत चांगले येते, या गैरसमजुतीतून या आगी लावल्या जातात. परंतु यातून पर्यावरणाची हानीच होते.
बहुतांश आगी प्रकल्पक्षेत्राबाहेर
आग आटोक्यात आणण्यासाठी वन्यजीव विभागाकडे 5 ब्लोअर मशीन आहेत. एक मशीन 10 ते 12 लोकांचे काम करते. मात्र बहुतांशी आगी या प्रकल्प क्षेत्राबाहेर लागत असल्यामुळे हद्दीचे कारण निर्माण होते. त्यामुळे याचा उपयोग अभयारण्याशेजारच्या डोंगर-दर्यांतून लागलेल्या आगी आटोक्यात आणण्यासाठी केला जात नाही, असे समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.