सांगली लोकसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीने हिरवा कंदील दाखवला आहे. पण, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची रविवार, दि. ३१ मार्च रोजी बैठक असून, यामध्ये सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीबाबत चर्चा होणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परवानगी दिली, तरच सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सांगली, भिवंडी, मुंबई दक्षिण मध्य तसेच इतर दोन जागांवर चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून मविआच्या बैठकीत या जागांवरून चर्चा सुरू आहे. सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्येच सांगली लोकसभेची जागा सोडण्याबाबत चर्चा होत होती. पण, या चर्चेत सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे. नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत, अशी घोषणा केली आहे.
मुकुल वासनिक यांचा पुढाकार..
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनीही सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन जिल्ह्यातील नेत्यांना दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवार, दि. ३१ मार्च रोजी बैठक होत आहे. या बैठकीमध्ये जागा वाटप झाल्यानंतर काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती कराव्यात का? अशी चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी दिली, तरच सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. अन्यथा काँग्रेसच्या उमेदवाराला थांबावे लागणार आहे.
काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आक्रमक
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, सांगली लोकसभेसाठीचे इच्छुक विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील या नेत्यांनी सांगली लोकसभेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारीही या नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही सज्ज आहोत, असा संदेश काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीला दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.