सांगली : येथील उषःकाल मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय कोगरेकर यांनी ही फिर्याद दिलेली आहे.
डॉ. कोगरेकर यांनी सांगितले की, उषःकाल हॉस्पिटलमध्ये अनेक व्याधींनी गंभीर आजारी शकुंतला सूर्यकांत शहा (वय ७७, रा. पाटीदार भवन, सांगली) यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा मुलगा राहुल शहा, सून संपदा व नातू यश यांनी बील चुकवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत दमदाटी करत रुग्णास पळवून नेले. तसेच राहुल यांनी कांगावा करत पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर ती मागे घेण्यासाठी खंडणीही मागितली.
डॉ. कोगरेकर यांनी सांगितले की, शकुंतला यांना, त्यांचा नातू यश याने १६ मार्च २०२४ रोजी डॉ. सतीश संकपाळ यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपचारासाठी दाखल केले होते. रुग्णालयाच्या सर्व अटी मान्य करून आवश्यक सर्व ठिकाणी त्यांनी सह्या केलेल्या आहेत. रुग्णावरील उपचार, तपासण्यांबद्दल सर्व माहिती त्यांच्या नातेवाईकांना वेळोवेळी दिली होती. १६ ते १९ मार्चदरम्यान रुग्ण अतिदक्षता विभागात होता. त्याची प्रकृती सुधारली होती. तरीही त्यांना अतिदक्षता विभागातून सक्तीने बाहेर काढण्याचा हट्ट राहुल यांनी धरला. त्यासाठी लेखी जोखीम पत्करली. त्यांनी रुग्णास अन्य विभागात स्थलांतर करण्यास भाग पाडले.
राहुल आणि इतरांनी रुग्णालयाचे थकीत बील ३९ हजार ३४६ रुपये न भरता, व्यवस्थापन व सुरक्षा यंत्रणेला दमदाटी करीत रुग्णास घेऊन पोबारा केला, असे डॉ. कोगरेकर यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे. या प्रकारानंतर राहुलने रुग्णालय व्यवस्थापनावर आरोप करीत विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांना व्यवस्थापनाने खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलची बदनामी करण्याचा प्रयत्न केला म्हणून या तिघांविरोधात तक्रार दाखल केल्याचे डॉ. कोगरेकर यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.