मोठी बातमी! शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांची बारामतीत महत्त्वाची बैठक
बारामती: आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तासभर आधीच शरद पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. बारामती विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात संस्थेची बैठक सुरू आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात सुरू असलेल्या या बैठकीला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थित आहेत. त्यामुळे बंद खोलीमध्ये काय चर्चा सुरू आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांच्या उठावानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता. दरम्यान आता बारामतीमधून राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे बारामतीत सुळे विरूद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.
मात्र त्यापूर्वी आज बारामती विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात संस्थेची बैठक झाली, या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उपस्थित असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. मात्र आता या बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.