Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

३०० जणांना शेती उत्पादनात गुंतवणुकीच्या नावाने २६ कोटींचा गंडा

३०० जणांना शेती उत्पादनात गुंतवणुकीच्या नावाने २६ कोटींचा गंडा

नवी मुंबई: शेती उत्पादनात गुंतवणूक करून महिना ५ टक्के नफा आणि ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत मिळवा, अशी जाहिरात करून रुद्रा ट्रेडर्स कंपनीने एजंटद्वारे सुमारे ३०० लोकांची अंदाजे २६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तक्रारअर्जाची छाननी करून संबंधित आरोपींविरोधात एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव, सचिन भिसे यांचा सहभाग असून, मुख्य आरोपी पार्टेसह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.

वाशीतील आलिशान व्यावसायिक संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गावरील सतरा प्लाझात कंपनीचे कार्यालय आहे. मसाला आणि सुका मेवा याचबरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करून निर्यात करण्याचे काम ही कंपनी करत असल्याचे भासवले जात होते. यातील आरोपी पार्टे हा लक्ष्मीप्रसाद को-ऑप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेचा संचालकही आहे.


या दोन्हींच्या जीवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची फसवणूक केली. यातील व्यवहार पारदर्शक असल्याचे भासवण्यासाठी लक्ष्मी प्रसाद को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे धनादेश, फिक्स डिपॉझिट बॉण्ड गुंतवणूकदारांना मार्च २०२२ पासून दिले जात होते. मात्र, परताव्याचे पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे घेतले त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने महेंद्र डेरे या गुंतवणूकदाराने एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक अशोक दामले, पोलिस उपनिरीक्षक नीलेश महाडिक यांचे पथक नेमले. या पथकाने आरोपींना गाफील ठेवून तपास सुरू केला. यात सर्व प्रकाराची खात्री पटल्यावर गुरुवारी रात्री आरोपींना अटक केली.

घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांनी स्वत:हून एपीएमसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील उरण येथे काही महिन्यांपूर्वी कोट्यवधींचा चिटफंड घोटाळा समोर आला होता. या प्रकरणी स्वतः पोलिसांनी पुढाकार घेत कारवाई केली व आरोपींना गजाआड केले. आता अशाच प्रकारचा चिटफंड घोटाळा समोर आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.