कुराणाची पानं जाळली : पाकिस्तानात माहिलेला जन्मठेप
कुराण धर्मग्रंथाची पाने जाळली म्हणून पाकिस्तानातील एका महिलेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 40 वर्षीय महिलेवर ईशनिंदेचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यात ती दोषी आढळल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याआधी अशाच एका प्रकरणात न्यायालयाने 9 मार्चला एका 22 वर्षीय विद्यार्थ्याला फाशीची, तर अन्य एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाब प्रांतातील लाहोर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. आसिया बीबी या महिलेने लाहोरमधील घराबाहेर कुराण जाळले. हा कुराणाचा अपमान आहे, त्यामुळे आसिया बीबीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे न्यायालयाने म्हटले. घराबाहेर कुराण जाळत असल्याची तक्रार आसिया बीबीच्या शेजाऱयाने पोलिसांकडे केली होती. त्यानंतर 2021 मध्ये आसियाला अटक करण्यात आली होती.
आसियाने कोणतीही निंदा केली नाही आणि तिच्या शेजाऱयाने वैयक्तिक वादातून तिच्यावर खोटे आरोप केले आहेत व तिला चुकीच्या पद्धतीने अडकवले आहे, असे आसियाच्या वकिलाने कोर्टात दावा केला, तर आसियाला कुराण जाळताना पोलिसांनी पकडले, हा युक्तिवाद विरोधकांनी केला. जळलेले कुराण जप्त करण्यात आले. आसिया या निर्णयाला लाहोर हायकोर्टात आव्हान देणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.