Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१ एप्रिलपासून बदलणार इन्कम टॅक्सचे अनेक नियम, ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या बदल

१ एप्रिलपासून बदलणार इन्कम टॅक्सचे अनेक नियम, ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या बदल


आर्थिक वर्ष २०२३-२४ संपायला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. १ एप्रिलपासून तुम्ही तुमचे आयकर रिटर्न देखील भरू शकता. आयकर विभागानं यासाठी ऑफलाइन फॉर्मही जारी केला आहे. तुम्ही हा फॉर्म इन्कम टॅक्स वेबसाइटवरूनही डाउनलोड करू शकता. मात्र, पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आयकराशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

याशिवाय फेब्रुवारीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. म्हणजे निवडणुका आणि सरकार स्थापनेपर्यंतचा अर्थसंकल्प, यालाच अंतरिम अर्थसंकल्प म्हटलं जातं. जुलैमध्ये संसदेच्या अधिवेशनात सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. सरकार करविषयक तरतुदींमध्ये काही बदल करू शकते. मात्र, आता आपण १ तारखेपासून बदलणाऱ्या नियमांबद्दल जाणून घेऊ.

नवी कर व्यवस्था डीफॉल्ट असेल

जर तुम्ही अजूनही तुमचा आयकर रिटर्न जुन्या कर प्रणालीमध्ये भरत असाल, तर तुम्हाला ते भरताना काळजी घेणं आवश्यक आहे. आता दरवर्षी तुम्हाला तुमची कर व्यवस्था निवडावी लागेल. अन्यथा आपोआप नवी कर प्रणाली सिलेक्ट केली जाईल.

मिळणार स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ

जर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडली, तरीही तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळेल. म्हणजेच तुम्हाला ५० हजार रुपयांची सूट मिळेल. असं केल्यानं तुमचं उत्पन्न ७.५ लाख रुपयांपर्यंत करमुक्त होईल.

कर सूट मर्यादा देखील बदलली

आता नवीन कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा वाढली आहे. करदात्याचं ३ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त असेल. आयकराच्या कलम 87A अंतर्गत मिळणारी सूट ५ लाखांवरून ७ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये, २.५ लाखांपर्यंत कोणताही कर नाही आणि कर सूट ५ लाख रुपयांपर्यंत आहे.

फॉर्ममध्ये बदल

आयकर विभागाकडून दोन फॉर्म जारी केले जातात. ITR-1 ला सहज आणि ITR-4 सुगम म्हणून ओळखलं जातं. यातही थोडा बदल करण्यात आला आहे. आता रिटर्न भरणाऱ्याला त्याच्या अकाऊंट टाईपसह मागील वर्षातील सर्व बँक खात्यांची माहिती उघड करावी लागतील. नवीन प्रणाली डीफॉल्ट करण्यात आली आहे. ITR-4 च्या करदात्यांना नवीन प्रणालीमधून बाहेर पडण्यासाठी फॉर्म 10-IEA दाखल करावा लागेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.