इस्लामाबाद : आर्थिक कोंडीतून पाकिस्तान अद्याप बाहेर आलेला नाही. देशातील लोक गव्हाच्या पिठासारख्या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करत आहेत. त्याचा फटका थेट संसदेत खासदार आणि पत्रकारांना बसल्याचे समोर आले आहे. 20 खासदार आणि पत्रकारांच्या चपलेचे जोड चोरीला गेले असून त्यांना अनवाणीच घऱी परतावे लागले. या घटनेच्या चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.
कठीण आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानी नागरिक अन्य देशांत जाऊन भिक मागत असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातच चोऱ्यामाऱ्यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. चोरांनी थेट सुरक्षा कडे तोडल्याने पाकिस्तानच्या संसेदचे पावित्र्यच भंग झाल्याचे द एक्सप्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे. या चप्पलचोरीच्या प्रकरणानंतर अधिकारी आणि पत्रकारांना धक्काच बसला. पाकिस्तानी संसदेच्या संकुलातून एवढ्या मोठ्या प्रमाणात चप्पल गायब होण्याच्या गूढ प्रकारामुळे सुरक्षा कर्मचारी हैराण झाले आहेत.
संसद भवनाच्या आतील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी ही घटना घडली. दुपारची नमाज पढण्यासाठी नॅशनल असेंब्लीचे (MNA) सदस्य, पत्रकार आणि संसदेतील कर्मचारी मशिदीत जमले होते. त्यावेळी मशिदीच्या दरवाजातून चपलांचे 20हून अधिक जोड चोरीला गेले. नमाज अदा केल्यानंतर आपापल्या कामावर परतण्याच्या तयारीत असलेले खासदार, पत्रकार आणि कर्मचारी आपल्या चपला न मिळाल्याने हैराण झाले. थोडी शोधाशोध केल्यानंतर ते अनवाणीच परतले. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांच्या आदेशानुसार सहसचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत असल्याचे द एक्सप्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे.
परदेशात जाऊन मागावी लागते भीक
साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) मुलतान विमानतळावर सौदी अरेबियाला जाणार्या फ्लाइटमधून उमरा यात्रेकरूंच्या वेशातील 16 कथित भिकाऱ्यांना खाली उतरविले होते. यामध्ये एक लहान मूल, 11 महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. या लोकांना देश सोडून उमरा व्हिसाच्या माध्यमातून सौदी अरेबियाला जायचे होते. इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान, एफआयएच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची चौकशी केली असता, आपण भीक मागण्यासाठी परदेशात जात असल्याची कबुली त्यांनी दिली होती.पश्चिम आशियाई देशांमध्ये भीक मागणारे मोठ्या संख्येने तुरुंगात असून त्यातही 90 टक्के लोक पाकिस्तानचे आहेत. या अटकेमुळे तुरुंगात गर्दी वाढल्याचे इराकी आणि सौदी राजदूतांनी कळविले होते. सुमारे 30 लाख पाकिस्तानी सौदी अरेबियामध्ये, 15 लाख यूएईमध्ये आणि 2 लाख कतारमध्ये आहेत. बहुतेक भिकारी सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये जाण्यासाठी हज यात्रेसाठी जारी केलेल्या व्हिसाचा फायदा घेतात आणि तिथे पोहोचल्यावर ते भीक मागतात, असे समोर आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.