Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" 400 पार काय सगळी लोकसभाच घ्या नां " गजानन कीर्तिकर यांची भाजपावर घणाघाती टीका

" 400 पार काय सगळी लोकसभाच घ्या नां " गजानन कीर्तिकर यांची भाजपावर घणाघाती टीका भाजप एकीकडे 'चारशे पार'चा नारा देत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी घणाघाती टीका केली आहे. 'चारशे पार काय सगळी लोकसभाच घ्या ना', असे म्हणत कीर्तिकरांनी टीका केली आहे. इतकंच नाही, तर मुलगा अमोल कीर्तिकर यांच्याबद्दल भाजपकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देत त्यांनी क्लिनचीट दिली आहे. 

गजानन कीर्तिकर यांनी एका मुलाखतीत ही भूमिका मांडली असून, याबद्दलचे वृत्तही माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, कीर्तिकरांच्या विधानामुळे ईडीच्या चौकश्यांही संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत.

 : कीर्तिकर नेमके काय बोलले?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी काय म्हटलं आहे, हे आधी वाचा...

कीर्तिकर म्हणतात, "ही जी पद्धती आणि संस्कृती आणलेली आहे भाजपने ती घातक आहे. आता चारशे पार ते (भाजप) करतायेत. मोदींना पंतप्रधान करू आम्ही, पण भाजपची ही जी वृत्ती आहे, ही त्यांना फार अडचणीत आणणारी आहे", अशी टीका त्यांनी केली आहे.

अमोल कीर्तिकर यांनी क्लिनचीट...

गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहे ठाकरे) लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ईडीच्या कारवाईने वेग घेतला. याबद्दल बोलताना गजानन कीर्तिकरांनी गंभीर विधाने केली आहेत.

ते म्हणाले, "आता अमोलवर काय आरोप आहे? अमोलवर आरोप असा आहे की खिचडी पुरवठा करणारी जी कंपनी आहे, त्याची स्थापना केली आहे संजय माशेलकरने. कोविड काळात ते लोकं सामाजिक कार्य करत होते."

"ज्यावेळी जम्बो हॉस्पिटलची संकल्पना आली तेव्हा अनेक व्हेंडर लागले. त्यात डॉक्टर, मेडिक सप्लाय कॉर्ड, बेडशीट. तेव्हा तिथल्या पेशंट्सना खिचडीचीही गरज होती. तेव्हा संजय माशेलकर यांनी कंपनी स्थापन केली. ज्यामध्ये अमोल आणि सूरज पण नाही. त्यांनी फक्त सप्लाय चेनमध्ये मदत केली."

"संजय माशेलकरांच्या कंपनीला प्रॉफिट (नफा) झाला. आणि प्रॉफिट (नफा) शिवाय कोणी धंदा करत नाही. त्यात स्कॅम (घोटाळा) वगैरे काही नाही. त्यांचं मानधन दिलं. त्याचा चेक दिला. त्यावर इन्कम टॅक्स (प्राप्तीकर परतावा) लागला आहे."

"चौकशी चौकशी म्हणजे काय.... मनी लाँड्रि्ंग केलं का? अमोल कीर्तिकर यांना त्रास देण्याचं कारण म्हणजे ते ज्या शिवसेनेत आहेत... भाजप नेते सांगतात म्हणून स्कॅम (घोटाळा) झाला म्हणून चौकशी होते", असे कीर्तिकर यांनी म्हटले आहे.

"ईडीचे अधिकारीही सांगतात की, यात नाही दम नाही. इन्क्वायरी (चौकशी) सगळी झालेली आहे. कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही, कारण क्रिमिनल केस नाही", असं कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.

सगळी लोकसभाच घ्या ना...

कीर्तिकर यांनी मोदींचं कौतुक करताना भाजपला सुनावलं आहे. ते म्हणाले, "मोदी चांगलं काम करतात. हिंदुत्वासाठी, सनातन धर्मासाठी, ३७० कलम, जीएसटी आणलं, राम मंदिर उभं केलं. पण, त्यांच्यामध्ये रुबाब आलाय, सगळं मीच घेईन. चारशे पार काय सगळी लोकसभाच घ्या ना."

"माझे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे. त्यांचे नेतृत्व आम्ही स्विकारलेले आहे. त्यांनाही मी सांगितलेलं आहे की, आपल्याला वेसन बांधलेलं नाहीये. आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे. मोदींनी पंतप्रधान करायचं आहे, हे एकट्या भाजपचं स्वप्न नाहीये. आमचंही आहे."

"आमचीही व्होट बँक आहे. ही व्होट बँक बाळासाहेबांनी तयार केलेली आहे. हिंदुत्वाचा विचार, राष्ट्रीयत्वाचा विचार, आक्रमक शैली, मराठी माणसांचा उद्धार या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेचे खेड्यापाड्यात कार्यकर्ते आहेत."

"माझे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांना मी याबद्दल सांगितलेले आहे. आणि मी जाहीरपणे बोलतोय की, आमचा मान राखला गेला पाहिजे", अशी घणाघाती टीका गजानन कीर्तिकर यांनी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.