Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

यंदा द्राक्षाची सांगलीतून 800 टनांनी वाढली निर्यात

यंदा द्राक्षाची सांगलीतून 800 टनांनी वाढली निर्यात 
यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील ९ हजार ६२७ शेतकऱ्यांनी २५ देशांत द्राक्षाची निर्यात केली आहे. या वर्षीचा द्राक्षाचा निर्यात हंगाम आटोपला असून, १८ हजार ७७१ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. ही निर्यात गतवर्षीच्या तुलनेत ८३४ टनांनी अधिक आहे.

सांगली जिल्ह्यातून गेल्या पाच वर्षापासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. मात्र पाणीटंचाई आणि त्यानंतर अवकाळी पावसाचा फटका तसेच द्राक्षावर बदलत्या वातावरणामुळे करपा आणि बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे बागांचे नुकसान झाल्याने द्राक्ष निर्यातीला याचा फटका बसला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागा उत्तम साधल्या.

यंदा जिल्ह्यातील ९ हजार ६२७ द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केली. या वर्षी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी पुढाकार घेतला असून ३ हजार ९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. दुबई आणि सौदी अरेबियाला निर्यात सुरू झाली आहे. जानेवारीपासून द्राक्ष युरोपियन देशांत पोहोचण्यास सुरुवात झाली. निर्यातीची गती वाढली असली तरी नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाची निर्यात कमी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता.

यंदा युरोपियन देशांत ७७५ कंटेनर म्हणजे १० हजार ३४८ तर आखातीसह अन्य देशांत ५९३ कंटेनरमधून ४८२३ अशा एकूण १३६८ कंटेनरमधून १८ हजार ७७१ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यातून युरोपियन देशात ८२५ कंटेनरमधून ९ हजार ७०२ टन तर आखाती देशात ४८९ कंटेनरने ७ हजार ६१५ टन अशी एकूण १७ हजार ९३७ टन द्राक्षे निर्यात झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ८३४ टनांनी द्राक्षाची निर्यात वाढली आहे.

प्रकाश नागरगोजे, कृषी अधिकारी (निर्यात), सांगलीयंदा द्राक्षाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने द्राक्ष निर्यात नोंदणी करण्यास शेतकरी पुढे आले नाहीत. त्यामुळे निर्यात कमी होईल, असा अंदाज होता. पण, शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन केल्याने द्राक्षाची निर्यात वाढली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.