काँग्रेसमधून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार विशाल पाटील यांच्यावर माघारीसाठी महाविकास आघाडीकडून एका बाजूला दबाव सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांच्या समर्थक शिष्टमंडळाने दबाव झुगारत शनिवारी स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी व सांगलीचे उमेदवार महेश खराडे यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेत उमेदवारी मागे घ्या . विशाल यांना पाठिंबा द्या असे साकडे त्यांना घातले.
सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी उद्धवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना मिळाली. त्यामुळे या जागेवर इच्छुक असलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. पाटील यांनी माघार घ्यावी, यासाठी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत हे शुक्रवारी व शनिवारी सांगली येथे थांबले होते. त्यांनी विशाल पाटील यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले. मात्र, विशाल पाटील यांनी त्यांना भेट दिली नाही. उलट विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून अपक्ष निवडणुकीची हालचाल सुरू झाली आहे.
विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची मागील आठवड्यात भेट घेतली. त्यावेळी तुमचा उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर आपण चर्चा करू, अशी सकारात्मकता डॉ. आंबेडकर यांनी दर्शविली होती. त्यानंतर स्वाभिमानी पक्षाचे सांगलीचे उमेदवार महेश खराडे यांची विशाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी दुपारी भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी शिराळ्यात जाऊन राजू शेट्टी यांच्याशी भेटून सांगलीतील पाठिंब्याविषयी चर्चा केली. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विशाल चौगुले, समाधान आवटी, सचिन वाडकर, सचिन डांगे, संदीप आडमुठे व राजू जाधव यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.विशाल पाटील यांचे शिष्टमंडळ आज भेटून गेले. त्यांनी पाठिंब्यासाठी विनवणी केली. परंतु, आमचे नेते राजू शेट्टी जो आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेणार असल्याचे सांगितले.- महेश खराडे, उमेदवार, स्वाभिमानी पक्ष
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.