मुंबई : सांगली लोकसभेची निवडणूक आता तिरंगी होणार हे निश्चित झालं आहे, कारण अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशीही विशाल पाटलांनी माघार घेतली नाही. सांगलीमध्ये आता भाजपचे संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात सामना होणार आहे. ही जागा लढवण्यासाठी काँग्रेस आधीपासूनच आग्रही होती. होती. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन हायकमांडचीही भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी सांगलीची उमेदवारी थेट जाहीर केल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली, पण जागावाटपामध्ये ही जागा अखेर उद्धव ठाकरेंच्याच पक्षाला गेली. यानंतरही काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी या जागेवर पुन्हा एकदा विचार करण्यात यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केली. विश्वजीत कदम यांच्या या मागणीचाही काही फायदा झाला नाही.विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे आता विश्वजीत कदम काय करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. आता विश्वजीत कदम यांची भूमिकाही समोर आली आहे. विश्वजीत कदम 25 एप्रिलला सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे तीनही नेते आणि मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहणार आहेत. विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे आता काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.