Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवडणूक खर्चात तफावत, महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस

निवडणूक खर्चात तफावत, महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस 


सांगली : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार, खासदार संजय पाटील यांना निवडणूक खर्चातील तफावतीबद्दल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी नोटीस बजावली आहे. खर्चाच्या नोंदवहीतील नोंदी आणि निवडणूक प्रशासनाला सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलात दोन लाखांची तफावत असल्याचे नोटिसीत म्हटले आहे. याबाबत ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.


उमेदवारांनी दररोजच्या खर्चाच्या नोंदी एका स्वतंत्र नोंदवहीत ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर दररोजचा खर्च जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे. या दोहोंतील खर्चाची तपासणी प्रशासनामार्फत केली जाते. पाटील यांच्या खर्चाची प्रथम तपासणी प्रभारी निवडणूक निरीक्षकांच्या पथकाकडून २६ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यामध्ये दोन लाखांची तफावत आढळली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील खर्च सनियंत्रण कक्षात सादर केलेल्या लेख्यांनुसार ९ लाख २ हजार ५०८ रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष नोंदवहीतील नोंदीनुसार हा खर्च ६ लाख ९४ हजार ९३३ रुपये आहे. या दोहोंतील तफावत २ लाख ७ हजार ५७५ रुपये आहे. निवडणूक कार्यालयाला सादर केलेला सर्व खर्च नोंदवहीत नोंदविला नसल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले. त्यामुळे नोटीस काढण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीत म्हटले आहे की, या त्रुटींची पूर्तता करून ४८ तासांत खुलासा सादर करावा. खुलासा केला नाही, तर २ लाख ७ हजार ५७५ रुपयांची तफावत आपण स्वीकारल्याचे समजले जाईल. ही रक्कम निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाईल. ही तफावत मान्य नसल्यास त्याबाबतची कारणे सादर करावीत. या कारणांसह जिल्हा खर्च सनियंत्रण समितीकडे विहित मुदतीत अपील दाखल करावे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.