Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव

वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव

भारतात मोफत आणि रास्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यावर सधन कुटुंबेही ताव मारताना दिसतात. भारतात ही बाब साधारण असली तरी परदेशात ही बाब गंभीरतेने घेतली जाते. कॅनडाच्या टीडी बँकेत काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या एका डेटा सायंटिस्टला अशाच मोफत अन्नधान्यावर हात मारल्यामुळे आपली नोकरी गमवावी लागली आहे. कॅनडामध्ये विद्यार्थी, बेरोजगार आणि गरीबांना फुड बँकेतून मोफत अन्नधान्य दिले जाते. मेहुल प्रजापती नामक डेटा सायंटिस्टने विद्यार्थी असल्याचा बनवा करून या फुड बँकेतून मोफत अन्नधान्य तर घेतलेच, शिवाय त्याचा व्लॉगही तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

मेहुल प्रजापती आपल्या व्हिडिओत फुड बँकेतून मोफत अन्नधान्य कसे मिळवावे, याची युक्ती सांगताना दिसत आहे. मेहुलला नोकरीतून वर्षाला ९८ हजार डॉलरचे उत्पन्न मिळते. तरीही तो फुड बँकेतून अन्नपदार्थ घेऊन शेकडो डॉलर कसा वाचवतो, हे तो अभिमानाने या व्हिडिओ सांगत आहे. प्रत्यक्ष फुड बँकेचाही व्हिडिओ त्याने काढला आहे. फुड बँकेत फळे, भाज्या, पास्ता पासून ते इतर अनेक पदार्थ मिळत असल्याचेही त्याच्या व्हिडिओत दिसत आहे.

मेहुल प्रजापतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे. कॅनडामधील फुड बँक ही वंचितांना आणि गरजूंना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. मात्र ज्यांना गल्लेलठ्ठ पगार आहे. त्यांनी या मोफत अन्नपदार्थांवर डल्ला मारणे योग्य नाही, अशी ओरड अनेकांनी केली. ‘एक्स’वर एका युजरने लिहिले, “या माणसाला वर्षाला ९८ हजार डॉलर पगार आहे. तरीही त्याने मोठ्या अभिमानाने मोफत अन्नपदार्थावर ताव मारून त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.” या कॅप्शनसह सदर युजरने टीडी बँकेच्या हँडललाही टॅग केले.

या पोस्टनंतर टीडी बँकेने याची गंभीर दखल घेत मेहुल प्रजापतीवर कारवाई केली. तसेच ज्या युजरने सदर पोस्ट केली होती, त्यालाही कंपनीने उत्तर दिले. तुम्ही आमच्या निदर्शनास जी बाब आणून दिली, त्याबद्दल आपले आभार. आम्ही सदर कर्मचाऱ्यावर कारवाई केली असून त्याला कामावरून कमी केले आहे, असे उत्तर कंपनीकडून देण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.