राजस्थानमधून एक मोठी घटना समोर आली आहे. अजमेरच्या कांचन नगर येथील मोहम्मदी मशिदीत काही अज्ञात मुखवटा घातलेल्या लोकांनी घुसून मशिदीत झोपलेल्या मौलानाची काठ्यांनी मारहाण करून निर्घृण हत्या केली. मौलाना माहिर हे गेल्या 8 वर्षांपासून मोहम्मदी मशिदीत मुलांना शिकवायचे आणि त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. काल रात्री ते मशिदीच्या पाठीमागील त्यांच्या खोलीत झोपले होते, त्यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मशिदीच्या मागील बाजूने तीन हल्लेखोरांनी मशिदीत प्रवेश करून खोलीत झोपलेल्या मौलाना यांच्यावर लाठ्याकाठ्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी मौलानांना जीव जाइ पर्यंत काठ्यांनी बेदम मारहाण केली.
झोपलेल्या मौलानाला बेदम मारहाण
ही घटना घडल्यानंतर ते तिघेही ज्या मार्गाने आले होते त्याच मार्गाने पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मशिदीत सुमारे 6 अल्पवयीन मुलेही झोपली होती. आवाजामुळे मुले जागे झाली आणि त्यांनी आरडाओरडा केला, तेंव्हा आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी देत हल्लेखोरांनी मुलांना खोलीबाहेर काढले. हल्लेखोर निघून गेल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी लहान मुलांच्या किंकाळ्या ऐकून मशिदीत पोहोचून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात
या घटनेची माहिती मिळताच रामगंज पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली. मौलानाच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक ओमप्रकाश हेही घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शेकडो मुस्लिम मशिदीजवळ जमा झाले. तणावाचे वातावरण पाहता पोलिसांनी मौलानाचा मृतदेह अजमेरच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे.रामगंज पोलिस स्टेशनचे अधिकारी रवींद्र खेगी यांनी माहिती देताना सांगितले की, कांचन नगर येथील मोहम्मदी मशिदीतील मौलवी मोहम्मद माहिर यांना तीन अज्ञात चोरट्यांनी काठ्यांनी मारहाण केली. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.