Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा विशाल पाटलांसमोर नवा प्रस्ताव

ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा विशाल पाटलांसमोर नवा प्रस्ताव 

सांगली: सांगलीच्या तिढ्यावरून विशाल पाटील  काय निर्णय घेणार याकडे लक्ष असतानाच आता ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे  यांनी विशाल पाटील यांच्यासमोर जत पॅटर्नचा प्रस्ताव ठेवला आहे. विशाल पाटील यांचे भाऊ प्रतीक पाटील मला भेटायला आले होते आणि मी त्यांना जत पॅटर्न राबवू असा प्रस्ताव दिला असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं. 

याबाबत आता विशाल पाटील काय भूमिका घेणार आणि जत पॅटर्न नेमका काय आहे हे पाहुयात,  उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटलांची नाराजी नुकतीच महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सांगली लोकसभेची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच राहील अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली. यानंतर चांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असणारे विशाल पाटील हे नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.



विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी थेट केंद्रीय नेतृत्व असणाऱ्या सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली. मात्र केंद्रीय नेतृत्वानेच उद्धव ठाकरे गटाला सांगलीची जागा दिल्यामुळे विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत असलेल्या विश्वजीत कदम यांचा देखील नाईलाज झाल्याचं पाहायला मिळालं.

प्रतीक पाटलांच्या भेटीगाठी सुरू

एकीकडे सांगलीची जागा न मिळाल्यामुळे विशाल पाटील नाराज असल्याची गोष्ट समोर आली, त्याचवेळी त्यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे जाऊन भेट घेतली. तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची मुंबईत त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. विशाल पाटील यांना या दोन्ही मोठ्या नेत्यांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी प्रतीक पाटील यांनी केल्याची माहिती आहे.

प्रकाश शेंडगेंचा जत पॅटर्न

प्रकाश शेंडगे यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत शेंडगे यांनी पाटील यांच्यासमोर जत पॅटर्नचा प्रस्ताव ठेवला. पुन्हा एकदा वसंतदादा पाटील घराणे आणि शेंडगे घरांणे एकत्र आलं तर नक्कीच सांगली लोकसभेसोबतच सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्था देखील ताब्यात येतील असा विश्वास दिला.

काय आहे जत पॅटर्न?

2009 साली पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमधे काँग्रेसची हक्काची जत विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी भाजपचे उमेदवार असलेले प्रकाश शेंडगे यांना पाठींबा दिला होता. त्यावेळी नाराज काँग्रेसचा पाठिंब्यामुळे प्रकाश शेंडगे निवडून आले होते. तीच परिस्थित पुन्हा निर्माण झाली आहे.

शेंडगे यांचं म्हणण आहे की शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना सेनेचे केडर नसल्यामुळे मतदान होणार नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी मला पाठिंबा द्यावा, आम्ही त्यांना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा बँक या सर्व निवडणुकांमध्ये पाठिंबा देऊ.

2014 साली विशाल पाटील यांच्या सांगण्यावरूनच संजयकाका पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यानंतर सलग दोन वेळा ते राष्ट्रवादीतल्या सांगली जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्याच्या मदतीमुळे भाजपचे खासदार होत आहेत. एकंदरीतच वसंतदादा पाटील कुटुंबीयांना हद्दपार करण्याचा सध्या प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे विशाल पाटील आता काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.